ShivSena protest against ST fare hike : अमरावतीत दिला ठिय्या, अकोल्यात सोडली चाकातली हवा
Akola Amravati राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या तिकीट दरात वाढ केली. या निर्णयाविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यभरातील प्रमुख एसटी डेपोंजवळ मंगळवारी ‘चक्काजाम’ आंदोलन करण्यात आले. अमरावती येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. तर अकोला येथील मध्यवर्ती बस स्थानकात बसमधील हवा सोडून निषेध नोंदविण्यात आला.
अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानकासमोर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी ११:३० वाजता आंदोलन छेडले. जिल्हाप्रमुख पराग गुडधे आणि मनोज कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे एसटी स्थानकात प्रचंड गर्दी उसळली. एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांवर आर्थिक भार पडत आहे, असे सांगत ठाकरे गटाने सरकारवर जोरदार टीका केली.
Nitin Deshmukh : संपूर्ण कर्जमाफी द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यच्या घरावर ट्रॅक्टर मोर्चा
‘महागाईने आधीच सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे, त्यातच सरकारने एसटी प्रवास महाग केला आहे,’ अशी टीका आंदोलकांनी केली. ठाकरे गटाने सरकारवर टीका करताना म्हटले की, ‘तुम्ही वायफळ खर्च करत आहात आणि त्याचा भार प्रवाशांवर टाकत आहात. ही भाडेवाढ अन्यायकारक असून, ती तातडीने मागे घेतली पाहिजे.’
राज्यभरातील अनेक एसटी डेपोंसमोर झालेल्या या आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. अमरावतीच्या बसस्थानकातही आंदोलनामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अकोला येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे आणि शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात मध्यवर्ती बस स्थानक आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांकडून बसमधील हवा सोडून निषेध नोंदविण्यात आला.
ठाकरे गटाने सरकारला इशारा दिला की, ‘जर एसटी महामंडळाने ही अन्यायकारक भाडेवाढ मागे घेतली नाही, तर संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.’ शिवसेनेने ही भाडेवाढ परत घेतली नाही, तर प्रवाशांसह मोठ्या आंदोलनाची तयारी असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सरकार या मागणीला कितपत प्रतिसाद देते, याकडे सर्वसामान्य प्रवाशांचे लक्ष लागले आहे.