Saranaik assures of building houses : सरनाईक यांचे घर बांधून देण्याचं आश्वासन
Dharashiv: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यात ईटकुर गावातील शिरसाट या पूरग्रस्त कुटुंबाला भेट देऊन त्यांचे हालहवाल जाणून घेतले. ठाकरेंनी दिलेल्या या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या कुटुंबाला थेट मदत पोहोचवली. किराणा सामान, चादरी, सतरंजी आणि भांडीकुंडी असा जीवनावश्यक वस्तूंचे किट शिरसाट कुटुंबाला देण्यात आले.
धाराशिवचे पालकमंत्री व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या कुटुंबाशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. “तुमच्या घरी कोण भेटायला आलं होतं? त्यांनी मदत केली का?” असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर घरातील महिलेने उत्तर दिलं, “उद्धव ठाकरे आले होते, आमदार, खासदारही आले, पण काही मदत केली नाही, फक्त फोटो काढून गेले.” यावर सरनाईकांनी दिलासा देत सांगितलं की, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्यासोबत आहेत. त्यांनी मला आवर्जून सांगितलं की, तातडीने पूरग्रस्तांना मदत पोहोचवा. ती मदत आपण कालपासूनच सुरू केली आहे.”
यावेळी सरनाईकांनी आश्वासन दिलं की, “भविष्यात घर बांधण्यासाठी किंवा इतर कोणतीही मदत लागली तर शासन तसेच शिंदे गटाकडून नक्की केली जाईल.” यावर पूरग्रस्त महिलेने स्पष्ट शब्दांत मागणी केली, “मला घर बांधून द्या, बाकी काही नको. आत्तापर्यंत माझ्या घराकडे कोणी लक्ष दिलं नव्हतं, पण मंत्री घरी आल्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष आलं आहे.”
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात त्यांनी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या अडचणी सरकारपुढे मांडल्या. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारला कठोर शब्दांत इशारे दिले. मात्र, ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या मदतीवर फोटोबाजीचा आरोप करण्यात आला आहे.
Vijay Thalapathy : करुरमध्ये विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी !
या घडामोडींमुळे ठाकरे गट आणि शिंदे गटातील राजकीय स्पर्धा आता थेट पूरग्रस्त कुटुंबांच्या मदतीपर्यंत पोहोचल्याचं चित्र दिसत आहे.