Shock to Hansraj Ahir : हंसराज अहीरांना एकामागून एक धक्के,नेतृत्वावर वाढता असमाधानाचा सूर

Hansraj Ahir Faces Consecutive Setbacks, Rising Dissent Over His Leadership : निलेश ताजनेचे बंड, तिसरी आघाडी अधिक मजबूत, अहीरांची पकड ढिली

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या नेतृत्वाला सलग हादरे बसत आहेत. प्रशांत समर्थ, त्यानंतर भद्रावतीमध्ये भाजपचे शहराध्यक्ष अॅड. सुनील नामोजवार यांनी काँग्रेसचा ‘हात’ पकडला आणि आता राजुरा विधानसभा मतदारसंघातील गडचांदुर येथील भैय्यांचे कट्टर समर्थक निलेश ताजने यांनी त्यांच्या विरोधात बंड पुकारले आहे.

हंसराज अहीर यांच्या अत्यंत निष्ठावान समजल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांनीही उघडपणे बंड पुकारण्यास सुरुवात केली आहे. गडचांदुर येथील भैय्यांचे कट्टर समर्थक निलेश ताजने यांनी भाजपला रामराम ठोकत तिसऱ्या आघाडीत प्रवेश केला असून भाजपसाठी ही धक्कादायक घडामोड ठरत आहे.

Municipal Corporation : NMCच्या स्वच्छता मोहिमेचा ‘कचरा’; सौंदर्यीकरणातील विलंबाविरोधात राष्ट्रवादीचा ‘हल्ला बोल’

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची मतदारसंघातील पकड गेल्या काही वर्षांत कमकुवत होत चालली असल्याचे राजकीय समीक्षकांचेही मत आहे. एकेकाळी भैय्यांचे विश्वासू समजले जाणारे कार्यकर्ते आज त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लावत एक-एक करून पक्ष सोडून जात आहेत. प्रशांत समर्थ यांच्या भाजपमधील बाहेर पडण्यावरची धूळही बसली नाही, तोच निलेश ताजने यांनी कमळाविरुद्ध बंड पुकारत अहीरांच्या नेतृत्वातील उघड बिघाड अधिक ठळक केला आहे.

ताजने यांनी तिसऱ्या आघाडीकडून दिलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर अधिकृतपणे नामांकन दाखल केले आहे. ही तिसरी आघाडी माजी आमदार, शेतकरी नेते अॅड. वामनराव तटप यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटना, गोंडवाणा गणतंत्र पार्टी व इतर मित्रपक्षांनी मिळून उभी केली आहे. या आघाडीत ताजने यांच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरु झाली आहे.
भाजपच्या गोटात मात्र चिंता वाढली आहे.

अहीरांच्या नेतृत्वातील गळती रोखण्यात पक्ष अपयशी ठरत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. एकेकाळी भैय्यांचे धुरंधर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निलेश ताजने यांनी कमळाचा त्याग करून तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारीला स्वीकार दिल्याने अहीरांच्या कार्यपद्धती, समन्वय कौशल्य आणि पक्षातील अंतर्गत व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Pune land scam : पार्थ पवार निर्दोष, सब-रजिस्ट्रारसह तिघांवर जबाबदारी

राजुरा मतदारसंघात आधीच असंतोष वाढत असताना ताजने यांची तिसऱ्या आघाडीत झालेली एंट्री भाजपसाठी आणखी एक मोठा फटका ठरू शकते. स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते नाराज, नेतृत्व गोंधळलेले आणि प्रतिस्पर्धी आक्रमक, या समीकरणात अहीरांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हंसराज अहीर यांच्या गढीत सुरू झालेल्या या गळतीने चंद्रपूरच्या राजकारणात खळबळ उडवली असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे बदल घडू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर पकडत आहे.