Sindkhed raja development : ‘तीन शिलेदार’ विधिमंडळात; आता तरी विकासाचा वनवास संपणार का?

two-mlas-one-officer-in-Legislature-council-sindkhedraja-hoping-for-development : सिंदखेड राजाचे दोन आमदार आणि एका वरीष्ठ अधिकाऱ्याचा समावेश

Sindkhed raja स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान म्हणून ऐतिहासिक ओळख असलेल्या सिंदखेड राजा मतदारसंघासाठी सध्या एक दुर्मिळ आणि उल्लेखनीय राजकीय योग जुळून आला आहे. राज्याच्या विधिमंडळात या मतदारसंघाशी संबंधित दोन आमदार आणि एक वरिष्ठ अधिकारी अशा तीन प्रभावशाली व्यक्ती कार्यरत आहेत. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासाला गती मिळेल का, आणि वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला विकासाचा अनुशेष भरून निघेल का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सध्या विधानभवनात सिंदखेड राजाशी संबंधित तीन महत्त्वाच्या व्यक्ती कार्यरत आहेत. त्यामध्ये सिंदखेड राजा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मनोज कायंदे, मेहकर मतदारसंघाचे आमदार असले तरी मूळचे सिंदखेड राजा तालुक्यातील ताडशिवणी येथील सिद्धार्थ खरात, तसेच विधिमंडळाचे अव्वर सचिव सुरेश मोगल यांचा समावेश आहे. मोगल हे तालुक्यातील चांगेफळ येथील सुपुत्र असून विधिमंडळाच्या कामकाजात अत्यंत महत्त्वाचे पद सांभाळत आहेत.

Congress internal politics : निष्ठावंतांना दुय्यम स्थान, आयारामांना संधी, जुन्यांमध्ये नाराजी!

या तिघांच्या उपस्थितीमुळे स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. “आमच्या हक्काची माणसे विधिमंडळात असतानाही जर तालुक्याचा विकास झाला नाही, तर ते दुर्दैव ठरेल,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाचा विकास आराखडा पूर्णत्वास नेण्यासाठी आणि सिंदखेड राजावरील ‘मागास’ हा शिक्का पुसण्यासाठी या तीन शिलेदारांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, तालुक्यातील अनेक मूलभूत प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. जिजामाता सहकारी साखर कारखाना आणि सूतगिरणी वर्षानुवर्षे बंद असल्याने उद्योगधंद्यांचा अभाव आणि बेरोजगारी वाढली आहे. संत चोखासागर प्रकल्प असूनही इतर जिल्ह्यांच्या पाणी आरक्षणामुळे स्थानिक शेतकऱ्यांना पुरेसे सिंचन मिळत नाही. तसेच तालुक्यात स्वतंत्र बस डेपो, शासकीय विश्रामगृह आणि अनेक शासकीय कार्यालयांसाठी स्वतंत्र जागा नसल्याची समस्या कायम आहे.

Rahul Bondre : ‘टँलेंट’ शोधण्याची जबाबदारी राहुल बोंद्रेंवर!

सिंदखेड राजा आजही ‘मागासलेला तालुका’ म्हणून ओळखला जातो. ही ओळख पुसण्यासाठी आणि विकासाची गती वाढविण्यासाठी या तीन शिलेदारांनी एकत्रितपणे विशेष निधी खेचून आणण्याची गरज असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. आता या ऐतिहासिक योगायोगाचे रूपांतर विकासाच्या संधीमध्ये होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.