Revenue clerk, Talathi arrested while accepting bribe of Rs. 7,000 : सिंदखेडराजा तहसील कार्यालयात एसीबीची कारवाई; जमीन वारस प्रकरणात लाच घेताना रंगेहाथ अटक
Buldhana जमीन वारस लावण्यासाठी सात हजार रुपयांची लाच घेताना सिंदखेडराजा तहसील कार्यालयातील महसूल लिपिक आणि तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील खापरखुटी येथील सज्जाचे तलाठी रावसाहेब काकडे यांच्याकडे जमीन वारस लावण्याचे प्रकरण प्रलंबित होते. संबंधित तक्रारदार जमीन मालक असून, तलाठी काकडे आणि तहसील कार्यालयातील वर्ग १ लिपिक मनोज झिने यांच्यातील आर्थिक व्यवहारामुळे प्रकरण रखडल्याचे समोर आले. आवश्यक कागदपत्रे पूर्ण असतानाही केवळ पैशासाठी काम थांबवले गेले.
Nitin Gadkari : १२ वर्षांच्या विराजमध्ये ‘विशेष’ टॅलेंट, गडकरींनी केले कौतुक!
तक्रारदाराने या गैरप्रकाराबाबत बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणात यापूर्वी चार वेळा सापळा रचण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, प्रत्यक्ष देवाणघेवाण होईपर्यंत परिस्थिती पोहोचत नव्हती. अखेर २४ जून रोजी दुपारी, पोलिस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पुन्हा सापळा रचला.
तहसील कार्यालयाच्या मागे ठरलेली सात हजार रुपयांची लाचेची रक्कम देत असतानाच, एसीबी पथकाने कारवाई करत दोघांनाही पकडले. प्राथमिक चौकशी व पंचनामा झाल्यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना बुधवारी मेहकर सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Buldhana BJP : भाजप कार्यकर्ता पंकज देशमुख मृत्यूप्रकरणी सीआयडी चौकशी करा!
सध्या महसूल कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव घेऊन दुप्पट रक्कम उकळण्याचे प्रकारही वाढले आहेत. सदर प्रकरणातही असाच प्रकार घडला. सुरुवातीला ठरलेली रक्कम स्वीकारल्यानंतर, उर्वरित रक्कम कामानंतर द्यावी अशी अट ठेवण्यात आली होती. मात्र, लाचलुचपत विभागाच्या सतर्कतेमुळे यावेळी सापळा यशस्वी ठरला.दरम्यान, पकडण्यात आलेले तलाठी दोन महिन्यांत सेवानिवृत्त होणार होते, ही बाबही या प्रकरणात चर्चेचा विषय बनली आहे.