Former Minister MLA Sudhir Mungantiwar’s determination ; माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार
Chandrapur : उद्योगविश्वातील बदलत्या मागणीनुसार प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर भर राहणार असल्याचा निर्धार राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. बल्लारपूर येथील राणी हिराई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रगतीचा त्यांनी अलीकडेच आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
या संस्थेचे पूर्णतः नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करण्याचे कार्य सध्या गतीने सुरू आहे. ही संस्था केवळ एक प्रशिक्षण केंद्र न राहता, महाराष्ट्रातील सर्वोत्तम आणि आधुनिक पायाभूत सुविधा असलेले आदर्श औद्योगिक प्रशिक्षण केंद्र व्हावे, हा आमचा ठाम संकल्प आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. उद्योग जगतातील बदलत्या मागण्यांनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी ही पायाभूत गुंतवणूक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीदरम्यान आमदार मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत एक आढावा बैठकही पार पडली. या बैठकीस लॉयड मेटल्सचे वरिष्ठ व्यवस्थापक अमित जयसिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उपअभियंता संजोग मेंढे, एसएनडीटी विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक डॉ. राजेश इंगोले, बल्लारपूर आयटीआयचे प्राचार्य राजरत्न वानखेडे आणि कनिष्ठ अभियंता खोरगडे उपस्थित होते.
Sudhir Mungantiwar : हरित महाराष्ट्राचे शिल्पकार, सुधीर मुनगंटीवारांच्या वाढदिवशी राज्यभर वृक्षारोपण
मुनगंटीवार म्हणाले की, यापूर्वी या आयटीआयला स्मार्ट आयटीआय म्हणून विकसित करण्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला गेला होता. या निधीतून संस्थेच्या इमारतीचे संपूर्ण नूतनीकरण, आधुनिकीकरण आणि फर्निचरचे कार्य सुरू आहे. याशिवाय संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ औद्योगिक अवजारांच्या डिझाइननुसार एक भव्य प्रवेशद्वार उभारण्यात यावा, तसेच परिसरात हवाईपट्टीसारखा रेडियम लाईनयुक्त रस्ता तयार करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
Happy Birthday Sudhir Mungantiwar : राजकारणातील स्पष्टवक्ते व्यक्तिमत्व – सुधीरभाऊ
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रिक्त पदांची तातडीने भरती करणे आवश्यक असून, येथील ट्रेडनिहाय विद्यार्थ्यांची संख्या आणि नोकरी लागण्याची टक्केवारी मोजून त्याचा अहवाल तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. विविध उद्योग व कंपन्यांशी बैठका आयोजित करून त्यांच्या मागणीनुसार कोर्सेस राबवण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत, असेही ते म्हणाले.
संस्थेतील स्टाफ आणि प्रशिक्षकांबरोबर सविस्तर बैठक घेऊन प्रशिक्षणासाठी आवश्यक वस्तू, यंत्र आणि साधनसामुग्रीची मागणी नोंदवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सध्या सोलार टेक्निशियन, आर्टिफिशियल प्रोग्राम असिस्टंट आणि इलेक्ट्रिकल व्हेईकल मेकॅनिक हे कोर्सेस प्रस्तावित असून, त्यासोबतच स्किल डेव्हलपमेंट सेंटरची प्रस्तावित इमारत मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Sudhir Mungantiwar :सुधीर मुनगंटीवारांचा वाढदिवस जिल्हाभर ‘विकास दिन’ म्हणून साजरा
या संपूर्ण प्रक्रियेमुळे बल्लारपूर आयटीआय हे महाराष्ट्रातील एक आदर्श, आधुनिक व सुसज्ज औद्योगिक प्रशिक्षण केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. या वेळी त्यांनी रिक्त पदांची स्थिती, आवश्यक साहित्य व उपकरणांची गरज आणि उद्योगांच्या मागणीनुसार आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.