Smart registration of visitors in Akola Collector office : अकोल्यात ‘स्मार्ट व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टिम’चा उपक्रम
Akola नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात ‘स्मार्ट व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टिम’ कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रभावी प्रणालीमुळे प्रशासकीय कामकाज अधिक जलद आणि कार्यक्षम होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी प्रशासनासाठी सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित केला आहे. त्याअंतर्गत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक अचूक, गतिमान आणि पारदर्शक करण्यावर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली भर दिला जात आहे. या प्रणालीच्या मदतीने जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची नोंद अधिक प्रभावीपणे ठेवली जाणार आहे.
Dr. Pankaj Bhoyar : खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता वाढवा!
नागरिक आणि अर्जदार यांचा तपशील, तसेच त्यांच्या अडचणी प्रणालीत नोंदवल्या जातील. प्राथमिक तपशील आणि फेस स्कॅनिंगद्वारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सर्व भेटींची डिजिटल स्वरूपात नोंदणी होईल, त्यामुळे समस्येवर झालेल्या कार्यवाहीचा मागोवा घेता येईल. नागरिकांनी यापूर्वी कधी, कोणत्या कारणासाठी भेट दिली होती आणि त्यावर कार्यवाही झाली का, याची संपूर्ण माहिती जिल्हाधिकाऱ्यांना सहज उपलब्ध होईल.
जिल्हाधिकारी या प्रणालीतूनच कार्यवाहीसाठी नोंद करतील, त्यामुळे पुनरावृत्ती होणाऱ्या तक्रारी प्रभावीपणे हाताळता येतील. या प्रणालीमुळे नागरिकांच्या तक्रारी जलदगतीने हाताळल्या जातील. जिल्हाधिकारी तक्रार ऐकल्यानंतर त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना प्रणालीद्वारे कार्यवाहीसाठी आदेश देतील. यापूर्वी ही प्रक्रिया प्रत्यक्ष कागदपत्रांच्या माध्यमातून होत असल्याने अधिक वेळ लागत असे. आता ही प्रक्रिया वेगवान होऊन नागरिकांचे प्रश्न अल्पावधीत सोडवले जातील.
MP Amar Kale : खेड्यांतील घरांनाही द्या अडिच लाखांचे अनुदान!
ही प्रणाली प्रशासन आणि नागरिक यांच्यात पारदर्शकता निर्माण करेल. समस्येच्या त्वरित सोडवणुकीमुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि शासकीय यंत्रणेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी व्यक्त केला.