Selling of scaly cats in Yavatmal; Six people arrested : वनविभाग शोधतोय तस्करीचे नेटवर्क
Yavatmal : दुर्मीळ वन्यप्राणी खवले मांजराची अवैध तस्करी व विक्री होत असल्याची गोपनीय माहिती वनविभागास प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे विभागाने सापळा रचून ६ जणांना ताब्यात घेतले. या सर्वांवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे.
यवतमाळ प्रादेशिक वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सापळा रचून सोनखास हेटी फाट्यावर सावर रोड येथे बनावट खरेदीदार पाठविला होता. तेथे असलेल्या ६ इसमांना पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. अटकेनंतर सर्व आरोपींना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयासमोर सादर करण्यात आले. न्यायालयाने सर्व आरोपींना दोन दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.
उपवनसंरक्षक धनंजय वायभासे यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक निलेश सोनवणे, दादासाहेब तौर, उपविभागीय वन अधिकारी संतोष चव्हाण यांच्या नेतृत्वात नेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष लंबे, संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन कार्यालय यवतमाळचे वनपाल बिजवार, वनरक्षक जिरापुरे, केराम, घाटोडे, नांदणे पोलिस अंमलदार भवरे, वनरक्षक मोहिते, ठेंगडे, मुसळे, बागडे, नाटकर, काळे, वाहनचालक नागमोते यांनी ही कारवाई केली.
Devendra Fadanvis : केंद्र शासनाकडून वित्त पुरवठा व्याजदर कमी असावेत!
अटकेतील आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांनी वन्यप्राणी खवले मांजर अवैधरीत्या ताब्यात घेऊन त्याची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. खवले मांजराची शिकार केल्याचे आढळल्याने शंकर पुनाजी हुमनेभारी (यवतमाळ), कौसल मनोहरप्रसाद तिवारी (यवतमाळ), युनूस खान गफार खान (अमरावती), विनोद रोहिदास राठोड (जांभूळणी, ता. यवतमाळ), संतोष मनोहरप्रसाद तिवारी (यवतमाळ), अनिस खान अहमद खान (अमरावती) यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या कलम ९, ३९,५१ कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. अधिक तपास वन विभागाकडून सुरू असून तस्करीचे नेटवर्क शोधले जात आहे.