Farmers have doubts about government soybean purchase : एकाच दिवशी १४ केंद्रांवर १८ हजार ३२३ क्विंटल खरेदी; नोंदणी केलेले ८ हजार ३३ शेतकरी वंचित
Akola केंद्र सरकारच्या आधारभूत किमतीत जिल्ह्यात मुदतीच्या अंतिम दिवशी, १४ खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर सोयाबीन खरेदी करण्यात आली. एकाच दिवशी तब्बल १८,३२२ क्विंटल सोयाबीन खरेदी झाल्याची नोंद आहे. मात्र, हा आकडा शेतकऱ्यांच्या संशयास्पद वाटत असल्याने त्यांनी खरेदी प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप केला आहे.
जिल्ह्यातील २८,९२४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. मात्र, त्यातील तब्बल ८,०३३ शेतकरी अंतिम टप्प्यात खरेदीपासून वंचित राहिले. यामुळे, हे शेतकरी खरेदी प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, शासकीय सोयाबीन खरेदीत बाळापूर तालुक्यातील अंदुरा अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीने ६३ लाख ४४ हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी कंपनीच्या संचालकांसह व्यवस्थापक अशा ११ जणांविरोधात २३ मार्च रोजी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कंपनीने शेतकऱ्यांच्या खोट्या नोंदी तयार करून शासन आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन घोटाळा झाल्याचे स्पष्ट होत आहे.
बडे व्यापारी, वेअरहाऊस चालक, जिल्हा पणन विभाग आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय हा प्रकार होऊ शकत नाही, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. जिल्ह्यात १ ऑक्टोबरपासून सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आली होती. ६ मार्च अखेर एकूण ५,२०,०८६ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. तथापि, ऑक्टोबरपासून खरेदी संथ गतीने सुरू होती. खरेदीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली.
Devendra Fadnavis : पुतण्या मुख्यमंत्री, तरीही काकूंवर आली आंदोलनाची वेळ!
मात्र, शेवटच्या दिवशी खरेदीचा वेग प्रचंड वाढल्याने अनियमिततेबाबत शंका निर्माण झाली आहे. शासकीय खरेदीत कंपन्यांचे संचालक, बडे व्यापारी, पणन विभागातील अधिकारी आणि वेअरहाउस चालक यांच्या संगनमताशिवाय असा प्रकार होणे शक्य नाही. अनेक केंद्रांवर बाहेरच्या जिल्ह्यातील सोयाबीन आणून खरेदी केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेअरहाउस तसेच ग्रेडरने केलेल्या तपासणीची चौकशी करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.








