State Budget : संत्रा प्रकल्पाच्या घोषणांचा निव्वळ ‘ज्युस’!

Amravati awaits decision on Orange Project : यंदा तरी ठोस निर्णय होईल का?; आतापर्यंत अर्थसंकल्पात ८ वेळा घोषणा

Amravati जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांत राज्य सरकार एकही संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारू शकले नाही, ही शोकांतिका आहे. विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करत १९५७, १९६३, १९९२, १९९५, २०१४, २०१७, २०१९ आणि २०२१ च्या अर्थसंकल्पात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही घोषणेला मूर्त स्वरूप मिळालेले नाही. संत्रा उत्पादनात अग्रगण्य मोर्शी-वरूड, पण प्रकल्पाचा पत्ता नाही. आतापर्यंत केवळ घोषणांचा ज्युस पाडण्यात आला. मात्र आता तरी ठोस निर्णय होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी-वरूड तालुका हा संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून विदर्भाचा ‘कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखला जातो. आशिया खंडातील सर्वाधिक संत्रा उत्पादन करणाऱ्या या भागातील नागपुरी संत्र्याने वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोर्शी-वरूड तालुक्यात ४७,००० हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर आंबिया व मृग बहाराच्या संत्र्याचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. मात्र, दुर्दैवाने या भागात आजही संत्रा प्रक्रिया करणारा एकही प्रकल्प नाही. कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस आणि संत्रा-मोसंबीवर प्रक्रिया करणाऱ्या सुविधा उपलब्ध नसल्याने शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. परिणामी, कवडीमोल भावात संत्रा विकावा लागतो.

Bor Wildlife Sanctuary : यंदा वाघाला पाण्याचे टेंशन नाही!

२०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरूड येथे ऑरेंज डिहायड्रेशन प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारनेही मोर्शी-वरूडसाठी संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्याची घोषणा केली. मात्र, ही घोषणाही कागदावरच राहिली.

२०२१ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोर्शी-वरूडमध्ये अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. मात्र, ती तीन वर्षांनंतरही अद्याप पूर्ण झालेली नाही. २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या व्यथा लक्षात घेऊन भरीव निधीची तरतूद करणार का? की हा प्रकल्प पुन्हा एकदा घोषणांच्या बाजारात हरवणार? याकडे विदर्भातील लाखो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

CM Devendra Fadnavis : आयआयएम नागपूरची Net Zero कडे वाटचाल!

आर्थिक तरतूद न झाल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे. शासनाने ऑरेंज डिहायड्रेशन प्रकल्प, अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प आणि हिवरखेड (ठाणाठुनी) येथील जैन फार्म फ्रेश संत्रा उच्चतंत्र प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून संत्रा प्रक्रिया प्रकल्प पूर्णत्वास न्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.