Mungantiwar’s initiative for a film on the life of Rashtrasant Tukadoji Maharaj : मंत्री असताना काढला होता शासनादेश, विद्यमान मंत्र्यांशी चर्चा
Chandrapur सांस्कृतिक कार्यमंत्री असताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट निर्मितीचा शासनादेश काढला होता. या आदेशाची त्यांनी विद्यमान सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना अलीकडेच आठवण करून दिली. आता लवकरच या चित्रपटाच्या निर्मितीचे काम सुरू होणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी स्थळाला ‘अ’ तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून देण्यासाठी देखील मुनगंटीवारांनी पुढाकार घेतला होता. नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंतांचे नाव देण्यासाठी विधिमंडळात आणि विधीमंडळाच्या बाहेरही त्यांनी यशस्वी लढा दिला. अलीकडेच त्यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री शेलार यांची भेट घेतली. मंत्री असताना त्यांनी काढलेल्या चित्रपटाच्या शासनादेशासंबंधी चर्चा केली. आता कार्यारंभ आदेशासाठी पुढील पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले.
अंधश्रद्धा निर्मूलन आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचावे. या उद्देशाने त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मितीची संकल्पना मांडण्यात आली. आता हा चित्रपट लवकरच साकारण्यात येणार आहे. यादृष्टीने मुनगंटीवार यांनी शेलार यांच्याशी चर्चा केली. शेलार यांनी लवकरच कार्यारंभ आदेश काढण्यात येईल, असा शब्द दिला.
या चित्रपट निर्मितीसाठी सहाय्यक अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील थोर व्यक्तींच्या जीवनावर चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने धोरण आखले आहे. त्याअंतर्गत या चित्रपटाच्या निर्मितीला अनुदान देण्यासंदर्भात मुनगंटीवार यांच्या मंत्रिपदाच्या काळात प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.
अभिनेत्री अलका कुबल यांच्याशी चर्चा
या संदर्भात चित्रपट कलावंतांनी सह्याद्री अतिथिगृह येथे आमदार मुनगंटीवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी अभिनेत्री अलका कुबल यांना कलावंतांनी उत्तम कलाकृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले होते, हे विशेष.