Chandrapur District Bank Recruitment Mungantiwar along with delegation met the Chief Minister : आरक्षणविरोधी धोरण सहन करणार नाही, मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही
Chandrapur News : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील नोकर भरती सुरूवातीपासूनच वादाच्या घेऱ्यात सापडली आहे. अपात्र उमेदवारांकडून लाखो रुपये उकळून ही भरती केली जात असल्याचा आरोप सातत्याने होतो आहे. त्यासाठी सर्व पक्षीय, सर्व समाजाच्या लोकांनी एकत्रितपणे लढा दिला आहे. आता राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार या प्रश्नी सरसावले आहे.
आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आमदार मुनगंटीवार यांनी मुंबईतील सह्यांद्री अतिथीगृहात सोमवारी (२७ जानेवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमध्ये एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण कसे संपवण्यात आले, याची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. आणि या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली. हा प्रश्न लवकर निकाली काढू, अशी ग्वाही दिली.
Accident in Gondia : बोलेरोची दुचाकीला धडक, आईसह दोन चिमुकले ठार
सहकार विभागाच्या सचिवांना अहवाल सादर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानुसार सचिव आज (२८ जानेवारी) तो अहवाल सादर करणार आहेत. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत ३५८ जागांच्या भरती प्रक्रियेचा शेवटचा टप्पा म्हणून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. ही भरती प्रक्रिया राबवताना जिल्हा बॅंकेने एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित ठेवली नाही.
आरक्षण बचाव संघर्ष समितीने २ जानेवारापूसन जिल्हा बॅंकेसमोरच बेमुदत साखळी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. १६ जानेवारीपासून मनोज पोतराजे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. सोमवारी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत सुरू असलेल्या भरतीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार व शिष्टमंडळाला हा प्रश्न लवकर निकाल काढण्याची ग्वाही दिली आहे. महायुती सरकार आरक्षणविरोधी धोरण अजिबात सहन करणार नाही. त्यामुळे लवकर यावर कार्यवाही केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.