Demand for new flyovers and roads in Ballarpur constituency : रहदारीची अडचण सोडविण्यासाठी नवे रस्ते आणि उड्डाणपुलांची मागणी
चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. मुनगंटीवार यांनी विविध रस्ते व उड्डाणपुलांच्या कामासाठी दिलेल्या निवेदनावर गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तर काही कामांना ऑन दि स्पॉट मंजुरीही दिली.
निवेदनामध्ये मूल शहरानजीक असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 मूल-चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना आरसीसी काँक्रीट ड्रेन मंजूर करणे. केंद्रीय मार्ग निधीच्या (सेंट्रल रोड फंड) माध्यमातून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील विकासकामांना मंजुरी देणे. तसेच कोठारी गावाजवळील 2 किमी अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करणे यांचा समावेश आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तहसीलमध्ये कोठारी गावाजवळील पुलानजीक 2 किमी रस्त्याचे अपूर्ण बांधकाम काम पूर्ण करण्याची विनंती मुनगंटीवार यांनी केली. त्याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यातील मुल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 वर, केंद्रीय रस्ते निधीतून मुल शहराजवळील रेल्वे ओव्हरब्रिजचे बांधकाम व्हावे, असेही निवेदन त्यांनी गडकरींना दिले. मुल शहराजवळील रेल्वे मार्गावरून मोठ्या संख्येने वाहने जातात. तसेच याच मार्गाने मालगाडीचीही वाहतूक होते. त्यामुळे प्रत्येक अर्धा तासाला रेल्वे क्रॉसिंगवर गेट बंद होतो आणि वाहतूक खोळंबते, याकडेही लक्ष वेधले.
मुल-चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी अंदाजे ८ किलोमीटरचे आरसीसी काँक्रिट ड्रेन मंजूर करण्याची विनंतीही मुनगंटीवारांनी केली. या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुंना चंद्रपूर जिल्ह्यातील जानाळा, आगडी, गोंडसावरी, महादवाडी, अजयपूर, चिचपल्ली, वलनी, घंटाचौकी आणि लोहारा ही गावे आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजुंना आरसीसी काँक्रीट नाल्याच्या मंजुरीची आवश्यकता असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील बल्लारपूर, मुल, पोंभुर्णा तालुक्यांमध्ये वेगाने औद्योगिकीकरण सुरू झाले आहे. हे तालुके चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेलगत आहेत. त्यामुळे रहदारीच्या दृष्टिकोनातून काही रस्त्यांचे व पुलांचे निर्माणकार्य आवश्यक असल्याची बाब मुनगंटीवार यांनी गडकरींकडे उपस्थित केली.
NCP Ajit Pawar Politics : तटकरेंना अॅलर्जी ‘संग्राम’ नावाची की मराठ्यांची ?
नॅशनल हायवे 353 बी बल्लारपूर-आष्टी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. 5 वर्षांचा कालावधीही पूर्ण झाला आहे. या मार्गावरील पुलाजवळ 2 किमी रस्त्याचे काम प्रलंबित आहे. या मार्गावर बर्याच ठिकाणी मोठे खड्डे असल्याने रहदारीला गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तसेच याठिकाणी मोठे अपघातही झाले आहेत. या 2 किमी रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांनी संबंधित विभागाकडे अर्ज केला आहे, परंतु आतापर्यंत कार्यवाही झालेली नाही, याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.