MLA Sudhir Mungantiwar emotional tribute to Ajit Pawar : आ. सुधीर मुनगंटीवार यांची अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली
Chandrapur : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात एक अभ्यासू, अनुभवी आणि ठाम विचारांचे नेतृत्व हरपले आहे. मतभेद असले तरी विचारांचा आदर राखणे आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणे ही त्यांची खरी ओळख होती, अशा शब्दांत माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रातील एक स्पष्ट वक्ता आणि वैयक्तिक आयुष्यातील एक सहृदय मित्र आपण गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
अजितदादांचा स्वभाव नेहमीच स्पष्ट, निर्भीड आणि सरळवक्तेपणाचा राहिला. जे योग्य वाटेल ते कोणताही आडपडदा न ठेवता मांडण्याची त्यांची भूमिका होती. सत्ता असो वा विरोध, राजकीय समीकरणांपेक्षा जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळेच अनेकदा त्यांच्या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना दिशा मिळाली. मतभिन्नता असूनही परस्पर सन्मान राखण्याची त्यांची शैली आजच्या राजकारणात दुर्मिळ असल्याचेही मुनगंटीवार यांनी नमूद केले.
Girish Mahajan : गिरीश महाजनांविरोधात शेगावात ‘वंचित’चे तीव्र आंदोलन
विधानसभा असो किंवा सार्वजनिक व्यासपीठ, अजित पवार यांचे बोलणे ठाम, मुद्देसूद आणि आशयघन असे. राजकारण हे केवळ पदांचे नव्हे, तर मूल्यांचे असते, ही जाणीव त्यांच्या वर्तनातून कायम प्रकट होत असे. विकासाच्या प्रश्नांवर प्रत्येकाला मदत करण्याची त्यांची भूमिका होती. दातृत्व या शब्दातील ‘दा’ हेच ‘दादा’ या विशेषणात सामावले असल्याचे त्यांनी सांगितले.
वैयक्तिक आयुष्यात अजितदादा हे आपुलकीचे, संवेदनशील आणि विश्वासू मित्र होते. राजकीय मतभेद कधीही वैयक्तिक नात्यांच्या आड येऊ नयेत, हा त्यांचा ठाम आग्रह होता. अनेक वेळा त्यांच्या स्पष्ट आणि प्रामाणिक शब्दांतून मार्गदर्शन मिळाले असून, आज तेच शब्द आठवणींतून अंतःकरणाला भिडत असल्याची भावना मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
आज अजितदादा आपल्यात नाहीत ही जाणीव मन सुन्न करणारी आहे. आबालवृद्धांसाठी सदैव तत्पर असलेला, पहाटे सहा वाजल्यापासून जनसेवेत झोकून देणारा हा लोकनेता आता आपल्यात नाही, ही कल्पनाच असह्य असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांचा आवाज शांत झाला असला तरी त्यांनी जपलेली मूल्ये, त्यांची राजकीय भूमिका आणि माणुसकीचा वारसा कायम स्मरणात राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Amravati Municipal Corporation : अमरावती महापौर निवडणूक आठवडाभर लांबली; गट नोंदणीला दिलासा
कै. अजितदादा पवार यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना असून त्यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना आणि असंख्य समर्थकांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, अशा शब्दांत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.








