MLA Sudhir Mungantiwar’s demand for SIT, Chandrapur District Bank’s board of directors in trouble : आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली लक्षवेधी, बॅंकेचे संचालक मंडळ अडचणीत
Chandrapur : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत सर्व नियमांची पायमल्ली करून नोकरभरती करण्यात आली. यामध्ये प्रत्येक इच्छुक उमेदवारांकडून ५० लाख रुपये उकळण्यात आले. आरक्षणाची तर पार ऐसीतैसी करण्यात आली. तरीही बॅंकेचे अध्यक्ष, संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई झाली नाही. पण आता बॅंकेची एसआयटी चौकशी होणार आहे.
राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात विधानसभा सभागृहात लक्षवेधी मांडली. बॅंकेत झालेले आणि सुरू असलेले सर्व गैरप्रकार त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची एसआयटी चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आता बॅंकेचे अध्यक्ष, संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे सावट गडद झाल्याचे दिसत आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील नोकर भरती सुरूवातीपासूनच वादाच्या घेऱ्यात सापडलेली आहे. अपात्र उमेदवारांकडून लाखो रुपये उकळून ही भरती केली जात असल्याचा आरोप सातत्याने करण्यात आला. त्यासाठी सर्वपक्षीय, सर्व समाजांच्या लोकांनी एकत्रितपणे लढा दिला. त्यानंतरही काहीच कारवाई न झाल्याने लोकांनी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे हा प्रश्न मांडला. त्यांनी लगेच या भ्रष्टाचाराची दखल घेतली.
Sudhir Mungantiwar : स्त्रीच्या सन्मानाची काळजी घेणे, हीच खऱ्या अर्थाने महिला दिनाची सार्थकता !
आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आमदार मुनगंटीवार यांनी मुंबईतील सह्यांद्री अतिथीगृहात २७ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमध्ये एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण कसे संपवण्यात आले, याची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आणि या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली. हा प्रश्न लवकर निकाली काढू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी तेव्हा दिली. महायुती सरकार आरक्षणविरोधी धोरण अजिबात सहन करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी तेव्हा ठणकावून सांगितले होते.
Sudhir Mungantiwar : आणीबाणीच्या लढ्यातील सैनिकांना २० हजार रुपये द्या !
आज (२५ मार्च) आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात लक्षवेधी मांडल्यानंतर गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी एसआयटी चौकशी लावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे बॅंकेवर कारवाईच्या प्रक्रियेला वेग येणार असल्याची अपेक्षा आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.