Nitin Gadkari’s Vision Accelerates India’s Road Revolution : बल्लारपूर मतदारसंघासह जिल्ह्यातील विविध विकास कामांवर चर्चा
Nagpur : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासह चंद्रपूर जिल्ह्यातील विकास कामांसाठी राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची काल (२८ ऑगस्ट) नागपुरात त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्गाच्या सद्यस्थितीबाबत गडकरींना निवेदन दिले. त्यांनी संवेदनशीलतेने सर्व विषय ऐकून घेतले आणि पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. गडकरींच्या ठाम व दुरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळेच देशातील रस्ते विकासाचा वेग वाढतो आहे, असे आमदार मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
चंद्रपूर जिल्ह्यालाही या विकासप्रवाहाचा मोठा लाभ मिळेल, असा विश्वास आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. मुल शहरातील वाहतूक समस्येच्या संदर्भात आमदार मुनगंटीवार यांनी निवेदन सादर केले. सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ चंद्रपूरद्वारे मुल बायपास रस्त्याची रचना करण्यात आली आहे. त्यानुसार या मार्गासाठी जमिनीचे अधिग्रहणही पूर्ण झालेले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० पासून मुल शहरातील रेल्वे क्रॉसींग मार्गे उमा नदीच्या पुलाजवळून जाणारा हा बायपास रस्ता सुमारे ६.१४ किलोमीटर लांबीचा असेल. या प्रस्तावित बायपास रस्त्यावर एक रेल्वे क्रॉसींग आहे. त्यावर रोड ओव्हर ब्रिज (ROB) चे बांधकाम करणे आवश्यक आहे, असे आमदार मुनगंटीवार यांनी गडकरींना सांगितले.
Sudhir Mungantiwar : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी गणेश प्रतिष्ठापना
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग ९३० मुल – चंद्रपूर येतो. या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुंना चंद्रपूर जिल्ह्यातील जानाला, आगडी, गोंडसावरी, महादवाडी, अजयपूर, चिचपल्ली, वलनी, घंटाचौकी आणि लोहारा ही गावे आहेत. या गावांच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुंना जुन्या, अरुंद व तुटलेल्या नाल्या आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी व सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यादृष्टीने मुल-चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुंना अंदाजे आठ किलोमीटर लांबीची कॉंक्रीट नाली करणे आवश्यक असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी लक्षात आणून दिले. यासोबतच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील बल्लारपूर, मुल, पोंभूर्णा येथील विकास कामांना केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत मंजुरी देण्याची मागणीही आमदार मुनगंटीवार यांनी केली.
मुल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग (एन.एच. ९३०) वरील रेल्वे क्रॉसींग (गेट क्र. जी.सी.एफ. १२३) येथे दररोजच्या प्रचंड वाहतुकीमुळे दीर्घकाळ वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण होते. यामध्ये सामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि फायर ब्रिगेडसारख्या सेवांना अडथळे निर्माण होतात. याशिवाय आर्थिक, औद्योगिक क्रियांवरही नकारात्मक परिणाम होतो. या समस्यांच्या कायमस्वरुपी निराकरणासाठी संबंधित ठिकाणी रेल्वे ओव्हर ब्रिज बांधणे आवश्यक असल्याचेही आमदार मुनगंटीवार यांनी नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले.








