पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे उभारले भव्य प्राथमिक आरोग्य केंद्र संकुल
Nagpur : आरोग्य सेवा मिळणे, हा जनतेचा अधिकार आहे, अशी राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मान्यता आहे. यासाठी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात उल्लेखनीय आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा सहज मिळाव्या, यासाठी त्यांनी जिल्ह्यात आरोग्य सेवेचे जाळे विणले आहे. यामध्ये आता भर पडणार असून आरोग्य सेवेत नवा अध्याय जोडला जाणार आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे भव्य प्राथमिक आरोग्य केंद्र संकुल आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. आमदार मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्या (१७ ऑक्टोबर) दुपारी १ वाजता या आरोग्य केंद्राचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर दूरदृष्ट प्रणालीद्वारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पोंभूर्णा तालुक्यात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा शब्द आमदार मुनगंटीवार यांनी नागरिकांना दिला होता, तो त्यांनी पूर्ण केला आहे.
प्रधानमंत्री खनिज कल्याण योजना २०१९-२० अंतर्ग प्राथमिक आरोग्य केंद्र संकुलासाठी ८ कोटी ७५ लाख २५ हजार रुपये आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी २०२४-२५ अंतर्गत स्मार्ट आरोग्य केंद्रासाठी एक कोटी ३२ लाख ७७ हजार ९४० रुपये निधी मंजूर झाला आहे. या निधीतून उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र संकुल आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उमरी पोतदारचे भव्य उद्घाटन उद्या केले जाणार आहे.
उमरी पोतदार परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या. किरकोळ आजारासाठीसुद्धा बाहेरगावी जाऊन उपचार घ्यावे लागत होते. या समस्येची दखल घेत पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटना प्रसंगी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांना आरोग्य केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवत आ.मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे आरोग्य केंद्र साकार झाले असून, उमरी पोतदार आणि परिसरातील शेकडो नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहेत.
आमदार मुनगंटीवार अर्थमंत्री असताना त्यांनी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्याकडून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाला एमआरआय मशीनसाठी ७.५ कोटी रुपयांचा निधी आणला, १.५ कोटी रुपयांची मोबाईल कॅन्सर व्हॅन, जिल्ह्यात १३ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र, ३२ स्मार्ट आरोग्य केंद्र,६ स्मार्ट रुग्णालय, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल उभारणी करण्यासोबत नेत्र व आरोग्य शिबिरे राबवून हजारो नागरिकांना दिलासा दिला आहे. “आरोग्यदायी चंद्रपूर” हा त्यांचा संकल्प त्यांनी कायम प्रत्यक्षात उतरवून दाखवला आहे, हे विशेष.