Breaking

Sudhir Mungantiwar : स्त्रीच्या सन्मानाची काळजी घेणे, हीच खऱ्या अर्थाने महिला दिनाची सार्थकता !

Sudhir Mungantiwar praised the Maharashtra State Teachers Council : शिक्षक, शिक्षण आणि राष्ट्रहितासाठी शिक्षक परिषद दृढपणे उभी राहणार

Chandrapur : समाजाच्या सर्वच स्तरांवर महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या हक्कांची जपणूक करणे, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांच्या योगदानाचा गौरव केला. शिक्षकहित, शिक्षणहित आणि राष्ट्रहित या त्रिसूत्रीवर कार्य करणारी ही परिषद शिक्षकांच्या हक्कांसाठी कायम दृढपणे उभी राहील, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार नागोजी गाणार, सरिता सोनकुसरे, डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. कल्पना गुलवाडे, नम्रता ठेमस्कर, पूजा चौधरी, संध्या गीरडकर, विवेक आंबेकर, विजयालक्ष्मी पोरेड्डीवार आदींची उपस्थिती होती.

Sudhir Mungantiwar : क्रांतीवीर बाबुराव शेडमाके हे पराक्रमाचे प्रतीक !

यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, स्त्री ही सृजन, सामर्थ्य आणि संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. तिच्या आरोग्याची व सन्मानाची काळजी घेणे, हीच खऱ्या अर्थाने महिला दिनाची सार्थकता आहे. महिला आज प्रत्येक क्षेत्रात सक्षमतेने पुढे जात आहेत. विशेषतः आर्थिक व्यवस्थापनात त्यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात महिलांची भूमिका मोठी आहे. त्या काटकसर करून आपल्या उत्पन्नाच्या सुमारे २६ टक्के रक्कम शिल्लक ठेवतात. त्यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन कौशल्य देशाच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरत आहे.

ते पुढे म्हणाले की, शिक्षकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. कॉन्व्हेंट शाळांतील शिक्षकांना अल्प मानधनावर काम करावे लागत आहे. यासंदर्भात कायदे अस्तित्वात असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात शिक्षकांच्या वाढत्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करून न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असेही आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले.

Sudhir Mungantiwar : विधानसभा अध्यक्ष म्हणाले, मुनगंटीवार यांच्या मुद्द्यात मेरीट आहे !

या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सामाजिक उपक्रम शिक्षक परिषदेने हाती घेतला. या स्तुत्य उपक्रमासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कौतुक केले. कार्यक्रमात डॉ. कल्पना गुलवाडे यांनी महिलांच्या आरोग्यविषयक उपयुक्त माहिती उपस्थितांसमोर मांडली.