CM Devendra Fadnavis gave instructions to Additional Chief Secretary for action : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्पर मुख्य सचिवांना दिले कार्यवाहीचे निर्देश
Chandrapur : धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस (प्रोत्साहनपर राशी) देण्याची मागणी केली. आ. मुनगंटीवार यांच्या ठोस निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात अप्पर मुख्य सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभाग यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवार, दि. २३ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली. विशेषतः धान उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च, मजुरी, खत व बियाण्यांच्या वाढत्या किमतींमुळे होणाऱ्या आर्थिक अडचणी लक्षात घेता प्रति हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस देण्याची आग्रही मागणी केली.
Ravi Rana Vs. Balwant Wankhede : ‘राणाच्या थोबाडीत मारली’ गाण्यावरून राजकारण पेटले
पूर्व विदर्भात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धान लागवड होत असून, चालू वर्षात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनस्तरावर तातडीच्या उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे मुनगंटीवार यांनी निवेदनात नमूद केले.
मागील खरीप हंगामात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस देण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला होता. त्याच धर्तीवर यंदाही शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनातही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न प्रभावीपणे मांडत धान बोनसची आग्रही मागणी केली होती. याआधी त्यांच्या पुढाकारामुळे विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना धान बोनसपोटी १६२८ कोटी रुपयांची विक्रमी रक्कम थेट विदर्भातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली होती. या निर्णयामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला होता.
Local Body Elections : चांदूरबाजारात मुस्लीम मतदारांनी जुळवले प्रहारचे गणित
पालकमंत्री असताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विक्रमी २०२ कोटी रुपयांचा पीक विमा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय, मागील वर्षी हेक्टरी २० हजार रुपयांच्या धान बोनससाठी २२७ कोटी रुपयांची तरतूद करून ती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. धान चुकत्याचे २७.५२ कोटी रुपये मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे कामही त्यांच्या पुढाकारातून झाले आहे.








