Jayant Patil praised Sudhirbhau Mungantiwar : महायुतीच्या कारभारावर ओढले ताशेरे. परंतु वाघांच्या संख्या वाढीच्या मुद्यावर केले कौतुक
Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री म्हणून केलेल्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. सुधीर मुनगंटीवार यांनी राबविलेल्या अभिनव योजना व संकल्पनांमुळे महाराष्ट्रातील वाघांची संख्या वाढल्याचे गौरवोद्गार जयंत पाटील यांनी काढले.
गेल्या सोमवारला (३ मार्च) राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात दिलेल्या अभिभाषणावर जयंत पाटील यांचे विधानसभेत भाषण झाले. या अभिभाषणावर बोलताना जयंत पाटील यांनी महायुतीच्या कारभारावर ताशेरे ओढले. परंतु वाघांच्या संख्या वाढीच्या मुद्यावर मात्र त्यांनी राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची तारीफ केली.
Sudhir Mungantiwar : आमदार मुनगंटीवारांचा पुढाकार, अन् पॅनल तांत्रिक अधिकाऱ्यांचे प्रश्न सुटणार!
काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच त्यांनी विकास कामांच्या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेतली होती. यावरून जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्तही पसरले होते.
परंतु अभिभाषणावर बोलताना जयंत पाटील यांनी महायुतीच्या एकूणच कारभाराचे वाभाडे काढले. लाडकी बहिण योजनेवरून राज्य सरकार आता पाय मागे घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी राज्यातील वाघांच्या उपद्रवाचा मुद्या उपस्थित केला. आज राज्यात ४००च्या वर वाघांची संख्या झाली आहे. वाघांची संख्या वाढविण्यासाठी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मोठे योगदान असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख जयंत पाटील यांनी केला.
जयंत पाटील प्रशंसा करत असताना आमदार सुधीर मुनगंटीवार सुद्धा सभागृहात उपस्थित होते. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, आज सुधीरभाऊ मंत्रीमंडळात नाहीत. परंतु वाघांच्या उपद्रवाचा आज प्रश्न उपस्थित झाला आहे. व्याघ्र व मनुष्यांच्या संघर्षाचा आज मोठा प्रश्न राज्याला भेडसावत आहे. या वाघांचे वास्तव्य रहिवाशी क्षेत्रात दिसून येत असल्याने शेतकऱ्यांचे जीवन धोक्यात आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात ८ वाघांची हत्या झाली. व्याघ्र व मनुष्यांमध्ये वाढत असलेल्या संघर्षाकडे राज्याच्या वनमंत्र्यांचे लक्ष आहे काय, असा सवालही त्यांनी केला.