Sudhir Mungantiwar strong warning, People answer those who underestimate Ram devotees : रामभक्तांना कमी लेखणाऱ्यांना जनता उत्तर देईल, सुधीर मुनगंटीवारांचा ठाम इशारा
Chandrapur : प्रभू श्रीराम संदर्भात सुरू असलेल्या राजकीय वक्तव्यांवर तसेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरातील राम कथेवर केलेल्या टीकेचा संदर्भाने आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी थेट आणि ठाम भूमिका मांडत स्पष्ट शब्दांत मत व्यक्त केले आहे. प्रभू श्रीराम हे केवळ श्रद्धेचे नव्हे तर भारताच्या संस्कृतीचे, अस्मितेचे आणि मूल्यव्यवस्थेचे प्रतीक असून रामाला काल्पनिक ठरवणारी मानसिकताच खऱ्या अर्थाने रावणाच्या विचारांची असल्याचा घणाघात त्यांनी केला.
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, रामकथा, रामायण आणि रामसेतू यांना नाकारणे म्हणजे देशाच्या इतिहासाला आणि सांस्कृतिक वारशालाच नाकारणे होय. प्रभू श्रीराम हे कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत. रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे लोक जनतेच्या भावना समजून घेण्यास अपयशी ठरत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
श्रीराम भक्त आणि रावणभक्त असा संघर्ष देशाने अनेक वेळा पाहिला असून, प्रत्येक वेळी सत्य, संस्कार आणि श्रद्धेचे प्रतीक असलेले श्रीरामच विजयी ठरले आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले. रामभक्तांना कमी लेखण्याचा किंवा त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता योग्य वेळी उत्तर देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
श्रीराम हा कोणत्याही एका पक्षाचा विषय नसून संपूर्ण भारताचा सांस्कृतिक आत्मा आहे. निवडणूक काळात श्रीरामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्यास तो कदापि सहन केला जाणार नाही, असे मुनगंटीवार यांनी ठामपणे सांगितले.
देशाच्या कानाकोपऱ्यात श्रीरामाचे नाव आदराने घेतले जाते आणि श्रीराममंदिर उभारणीने त्या श्रद्धेला नवे बळ मिळाले आहे. या श्री राम मंदिर उभारणीत चंद्रपूरच्या काष्ठचे योगदान आहे.हा चंद्रपूर जिल्ह्याचा विजय वडेट्टीवार करत आहे. चंद्रपूर जनता अशा लोकांना कदापि माफ करणार नाही,असे मुनगंटीवार म्हणाले अशा परिस्थितीत रामाला नाकारणारी भूमिका ही केवळ राजकीय अपयश झाकण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सूचित केले.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या विकासावर बोलण्याची नैतिकताच काँग्रेसने गमावली*
राम आणि रावण या प्रतीकांच्या माध्यमातून भारतीय समाजाला दिशा मिळत आली आहे. सत्याच्या बाजूने उभे राहणारे श्रीराम आणि अहंकाराचे प्रतीक असलेला रावण, या संघर्षात जनता नेहमीच रामाच्या बाजूने उभी राहिली आहे आणि यापुढेही राहील, असे सांगत मुनगंटीवार यांनी आपल्या वक्तव्याचा शेवट केला.








