
praful-patel-ncp-sunetra-pawar-leadership-oath-clarification : राज्यातील सर्वाधिक चर्चेच्या मुद्द्यावर प्रफुल पटेलांनी स्पष्ट केली भूमिका
Mumbai : दिवंगत नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख चेहरा अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या नेतृत्वाबाबत निर्माण झालेल्या चर्चांवर प्रफुल पटेल यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रवादीचे नेतृत्व देण्याबाबत पक्षातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा एकमुखी आग्रह होता, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले. पवार कुटुंबाची तीन दिवसांचा शोक पाळण्याची परंपरा असल्याने चौथ्या दिवशी शपथविधी करण्यात आला असून, त्यामागे कोणतीही घाई नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर प्रफुल पटेल माध्यमांशी बोलत होते. अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीत अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या अस्थीकलशांचे राज्यभर वितरण करण्यात आले असून, विविध जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेतृत्व कुणाकडे राहणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
प्रफुल पटेल यांनी सांगितले की, अजित पवार आणि मी एकत्रच राजकारणात आलो. १९९१ साली आम्ही दोघांनी एकाच वेळी राजकीय प्रवासाची सुरुवात केली आणि गेली अनेक दशके एकत्र काम केले. आज अजित दादा आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही. त्यांचा चेहरा सतत डोळ्यासमोर येतो, असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अजित पवार यांच्याशी झालेली शेवटची भेट आठवताना प्रफुल पटेल म्हणाले की, सुमारे पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्याशी फोनवर संवाद झाला होता. त्या वेळी जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी सुरू होती. ‘प्रफुलभाई, आता आपली भेट होणार नाही, मी सात-आठ दिवस झेडपीच्या दौऱ्यावर असेन,’ असे अजित पवारांनी म्हटले होते. त्यांचे हे शब्द आजही मनातून जात नाहीत, असे भावूक होत त्यांनी सांगितले.
१९९१ पासूनचा राजकीय प्रवास आठवताना प्रफुल पटेल म्हणाले की, अजित पवारांनी आयुष्यात आलेले अनेक चढ-उतार मोठ्या धैर्याने पार केले. २०२३ मध्ये घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयावेळी आम्ही एकत्र होतो आणि सर्व आव्हाने सामूहिकपणे पेलली. पुढील टप्प्याचा विचार सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली, याचे दुःख कायम आहे.
अजित पवार यांचा परिवार म्हणजे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे कार्यकर्ते असल्याचे सांगत प्रफुल पटेल म्हणाले की, अजित दादांची काम करण्याची शैली, त्यांची शिस्त आणि निर्णयक्षमता हीच पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे. काम करत राहणे, पुढे जाणे आणि दिलेली वचने पूर्ण करणे हीच अजित पवार यांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
__








