Sunetra pawar : सुनेत्रा पवारांची नरहरी झिरवळांना स्पष्ट समज, देवगिरी बंगल्यावर काय घडलं ?

sunetra-pawar-narhari-zirwal-devgiri-bungalow-meeting-acb-bribery-case : एसीबी कारवाईनंतर मंत्र्यांच्या अडचणी वाढल्या

Mumbai : अन्न व औषध प्रशासन विभागातील लाच प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अडचणी वाढल्या असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन खात्याच्या तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात कार्यरत असलेला कर्मचारी राजेंद्र ढेरिंगे याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. या घटनेमुळे प्रशासकीय तसेच राजकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.

या पार्श्वभूमीवर मंत्री नरहरी झिरवळ यांनी मुंबईत सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचे समजते. देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत मोजक्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांनी झिरवळ यांच्यासमोर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. पक्षाची आणि सरकारची प्रतिमा मलिन होणार नाही, याची दक्षता घ्यावी तसेच प्रशासन आणि अधिकाऱ्यांबाबत कोणतीही नकारात्मक छाप पडणार नाही, यासाठी कठोर खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचे सांगितले जाते.

Pune land scam : पुणे मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना समितीकडून क्लीन चिट!

लाच प्रकरण उघड झाल्यानंतर झिरवळ काही काळ संपर्काबाहेर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही हालचालींना वेग आला. सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या सुकाणू समितीची तातडीची बैठक बोलावली होती. देवगिरी बंगल्यावर आधी आमदारांची बैठक झाली, त्यानंतर वरिष्ठ नेत्यांची स्वतंत्र बैठक पार पडली. या बैठकीत प्रकरणामुळे निर्माण झालेल्या प्रतिमेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.

दरम्यान, नरहरी झिरवळ यांनी लाच प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रतिक्रिया देताना, “माझ्या विभागातील कर्मचारी लाच प्रकरणात सापडला ही माझीही जबाबदारी आहे. चौकशीत या प्रकरणाचे धागेदोरे माझ्यापर्यंत पोहोचले तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन,” असे स्पष्ट वक्तव्य केले होते. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Cotton Federation of India : कापूस खरेदीच्या मुदतीवरून शेतकरी चिंतेत; २७ फेब्रुवारीची डेडलाईन वाढवण्यासाठी सरकारवर दबाव

सूत्रांच्या माहितीनुसार, झिरवळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊ शकतात. या भेटीत ते आपली बाजू मांडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एसीबीच्या कारवाईनंतर निर्माण झालेल्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर पुढील निर्णय काय होणार, याबाबत राज्याच्या राजकारणात उत्सुकता वाढली आहे.