sunetra-pawar-starts-early-morning-meetings-with-workers-like-ajit-pawar-pune : पुण्यातील सर्किट हाऊसची १५ वर्षांची परंपरा सुनेत्रा पवारांकडून कायम
Pune राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) बलस्थान असलेल्या पुणे जिल्ह्यात कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याची १५ वर्षांची परंपरा सुनेत्रा पवार यांनी पुनरुज्जीवित केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार ज्याप्रमाणे दर शुक्रवारी पहाटे ६ वाजल्यापासून सर्किट हाऊस येथे कार्यकर्त्यांच्या तक्रारी आणि समस्या जाणून घेत असत, अगदी त्याच ‘दादा शैलीत’ सुनेत्रा पवार यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. अजितदादांच्या अनुपस्थितीत ही परंपरा खंडित होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी पुण्यात कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केला.
अजित पवार तब्बल १५ वर्षे पुण्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या कामाच्या झपाट्यामुळे अधिकारी आणि कार्यकर्ते दोघांमध्येही त्यांचा दरारा असायचा. पहाटे ६ वाजता भेटीगाठी सुरू करणे आणि त्वरित निर्णय घेणे ही दादांची ओळख होती. आता सुनेत्रा पवार यांनीही पहाटेच्या भेटींना प्राधान्य देऊन पक्षात सातत्य राखण्याचा प्रयत्न केला आहे.
Pune MIT vandalism : पुण्यात एमआयटीच्या सांस्कृतिक महोत्सवात राडा; बांगलादेशी स्टॉलची तोडफोड!
गुरुवारी पुण्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना अजितदादांची उणीव प्रकर्षाने जाणवली. चुकीच्या कामावर तंबी देणारे आणि चांगल्या कामाची पाठ थोपटणारे ‘दादा’ नसले तरी, सुनेत्रा वहिनींनी कार्यकर्त्यांचा संवाद कायम ठेवल्याने पक्षाला मोठा आधार मिळाला आहे.
पुण्यातील पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकांनी मोठी उपस्थिती लावली. अजितदादांच्या जागी सुनेत्रा पवार यांना पाहून कार्यकर्ते काहीसे भावनिक झाले होते, मात्र त्यांच्या आश्वासक भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
शुक्रवारी पुण्यात कार्यकर्त्यांच्या भेटी आटोपून शनिवारी बारामती दौऱ्यावर जाण्याचे ‘शेड्युल’ही सुनेत्रा पवार यांनी स्वीकारल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे नवनियुक्त सदस्य सुनेत्रा पवार यांना भेटून आपल्या भागातील विकासकामांचे प्रश्न मांडत आहेत.
Nashik Mahavitaran : नाशिकमध्ये सरकारी जमिनीवर ‘भू-माफियांचा’ डोळा; गुन्हा दाखल करण्याची मागणी
पुणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य केंद्र असल्याने, तेथील कार्यकर्त्यांमध्ये मरगळ येऊ नये याची काळजी पक्षश्रेष्ठींकडून घेतली जात आहे. सुनेत्रा पवार यांनी स्वतः पुण्यात तळ ठोकल्याने “पक्ष आणि नेतृत्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असा स्पष्ट संदेश राजकीय वर्तुळात गेला आहे.








