Thackeray group mouthpiece makes serious allegations against BJP : संपूर्ण प्रक्रियेवर ठाकरे गटाच्या मुखपत्रातून भाजपवर गंभीर आरोप
Mumbai: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित आणि वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यांच्या निधनानंतर अवघ्या काही काळात पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आणि वादाला तोंड फुटले आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ने तीव्र शब्दांत टीका करत, हे सर्व घडामोडी पूर्वनियोजित असल्याचा गंभीर दावा केला आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, अजित पवार यांच्या निधनाचे सुतक संपण्याआधीच सत्ता हस्तांतरणाची घाई दाखवण्यात आली. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या, ही बाब स्वागतार्ह असली तरी शपथविधी ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने पार पडला, त्यावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचे नमूद केले आहे. सध्याचे राजकारण संवेदनाहीन आणि वंगाळ दिशेने जात असल्याची टीका करत, सत्तेसाठी कोणत्याही मर्यादा पाळल्या जात नसल्याचा टोला लगावण्यात आला आहे.
अग्रलेखात पुढे असा दावा करण्यात आला आहे की, अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील संबंध पुन्हा सुधारत होते आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांचे विलीनीकरण होण्याच्या हालचाली सुरू होत्या. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, काही नेत्यांना हे विलीनीकरण मान्य नव्हते. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत, भाजप नेतृत्वाच्या सूचनेनुसार पवार कुटुंबातील राजकीय गुंता कायम ठेवण्याचा डाव खेळला जात असल्याचे म्हटले आहे.
सुनेत्रा पवार यांच्यासमोर आता खरी कसोटी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. अजित पवार यांच्याकडे असलेली प्रशासकीय पकड, अर्थ व नियोजन खात्याचा अनुभव, तसेच त्यांचा कामाचा वेग आणि जनसंपर्क यांची सर सुनेत्रा पवार लावू शकतील का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या गटात नेतृत्वासाठी अंतर्गत स्पर्धा सुरू असून, या सत्तेच्या नौकेला वादळातून बाहेर काढण्याची जबाबदारी आता सुनेत्रा पवारांवर असल्याचे स्पष्ट केले आहे.
या नव्या सत्तासमीकरणात इंजिन आणि रिमोट कंट्रोल भाजपकडेच असल्याचा आरोप करत, देवेंद्र फडणवीस यांच्या हातात खरी सत्ता राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. सुनेत्रा पवार प्रभावी नेतृत्व उभे करतात की केवळ नावापुरत्या उपमुख्यमंत्री ठरतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागल्याचे नमूद केले आहे.
Union Budget 2026 : हा अर्थसंकल्प जनतेसाठी नव्हे, तर उद्योगपतींसाठी, ठाकरे गटाकडून निषेध
शेवटी, सध्याचे शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हे भाजपच्या पाठिंब्यावरच सत्तेत टिकून असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत असून, त्याआधी या दोन्ही गटांतील अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्या काळात सुनेत्रा पवार आपले राजकीय अस्तित्व आणि नेतृत्व सिद्ध करू शकतात की नाही, हीच त्यांची खरी कसोटी ठरेल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.








