Appeal to strengthen the resolve of an united India : सुनील देवधर यांचे विधान; अखंड भारताचा संकल्प दृढ करण्याचे आवाहन
Akola “दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल हे विधान अतिशय चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चाफेकर बंधू, लोकमान्य टिळक, योगी अरविंद, रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद, अल्लुरी सीताराम राजू यांसारख्या असंख्य क्रांतिकारकांनी शस्त्र उचलले, त्यांचे योगदान विसरता येणार नाही. फक्त अहिंसेमुळे भारत स्वतंत्र झाला, हे अर्धसत्य आहे. पूर्ण सत्य म्हणजे अनेकांच्या बलिदानामुळे आणि विशेषत: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे स्वातंत्र्याचा पाया मजबूत झाला,” असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय संयोजक सुनील देवधर यांनी केला.
संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने अखंड भारत संकल्प दिनानिमित्त खंडेलवाल भवन येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून देवधर उपस्थित होते. ‘अखंड भारत – संकल्प ते साकार’ या विषयावर बोलताना देवधर म्हणाले, “भारताची खरी ताकद त्याच्या सांस्कृतिक मुळांमध्ये आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून आपले योगदान दिले पाहिजे.” त्यांनी अखंड भारताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून ते फाळणीनंतरच्या घडामोडी आणि भविष्यातील पुनर्मिलनाच्या शक्यता यावर सखोल विवेचन केले.
Local Body Elections : जिल्हा परिषदेच्या गटांचा अंतिम आराखडा पाच दिवसांत?
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. स्वागत व परिचय सौ. सोनलताई ठक्कर यांनी, तर प्रास्ताविक प्रा. नितीन बाठे यांनी केले. अखंड भारत निबंध स्पर्धेबाबत रश्मी कायंदे यांनी माहिती देत विजेत्यांची घोषणा केली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विनय जकाते यांनी वैयक्तिक गीत सादर केले. सूत्रसंचालन श्री. चेतन काळे यांनी केले. महेशजी जोशी यांनी “वंदे मातरम्” सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी समितीचे समीर थोडगे यांनी आभार मानत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.








