Kedar supporters Boycott on Congress meeting : जिल्हा बैठकीत पदाधिकारी अनुपस्थित; अंतर्गत धुसफुस कायम
Nagpur विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसमध्ये सुरू झालेली धुसफूस निकालानंतर वाढली. आता खुले बंड सुरू झाले आहे. माजी मंत्री सुनील केदार यांच्या समर्थकांनी जिल्हा काँग्रेसच्या बैठकीला दांडी मारून ते दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणणारे सुनील केदार यांना विधानसभेत सपशेल अपयश आले होते.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतरदेखील जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये गटबाजी कायम आहे. प्रदेश काँग्रेसच्या सूचनेवरून शुक्रवारी गणेशपेठ येथील कार्यालयात जिल्हा काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला माजी मंत्री सुनील केदार यांचे समर्थक असलेले बहुतांश पदाधिकारी अनुपस्थित होते. केदार समर्थकांचा जणू बैठकीवर बहिष्कार आहे की काय, असा प्रश्न बैठकीत उपस्थित असलेल्यांना पडला. याचे पडसादही बैठकीत उमटले.
High Court Nagpur Bench : ‘त्या’ निर्णयावर फेरविचार शक्य नाही!
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय जगताप, नाना कंभाले, अरुण हटवार यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकारी तुळशीरान काळमेघ, श्रीराम काळे आदींनी पक्षातील गटबाजीवर उघड नाराजी व्यक्त केली. प्रदेश काँग्रेसच्या सूचनेवरून ही बैठक आयोजित करण्यात आली. तरी बहुतांश पदाधिकारी आले नाहीत. त्यामुळे आता नेत्यांच्या घरी चला, आपण सर्वांच्या पाया पडू, काय चुकते ते विचारू, असे आवाहन या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर यांना केले.
प्रदेश काँग्रेसने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार विरोधात आंदोलन करण्याचे निर्देश दिले आहेत. आपण असेच आपसात भांडत राहिलो तर सत्ताधाऱ्यांविरोधात कसे लढणार, असा प्रश्नही पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर सोमवारी दुपारी १२ ते २ या वेळेत संविधान चौकात आंदोलन केले जाणार आहे. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल.
या आंदोलनात सर्व काँग्रेसजनांनी सहभागी होण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. बैठकीला केदार गटातील बहुतांश नेते अनुपस्थित असल्याने विविध कयास वर्तविण्यात येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत याचा कॉंग्रेसला फटका बसू शकतो हे विशेष.