Discussions on issues in state held as soon as the elections are announced : निवडणुक जाहीर होताच राज्यातील प्रश्नांवर करणार चर्चा
New Delhi मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या, तर आता दुसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शरदचंद्र पवार पक्षाचे शिष्टमंडळ अमित शाहांची भेट घेणार असून या शिष्टमंडळाचे नेतृत्व सुप्रिया सुळे करणार आहेत.
Municipal election : 15 ला मतदान, 16 जानेवारीला निकाल, आजपासून आचारसंहिता
सूत्रांच्या माहितीनुसार ही भेट राज्यातील विविध महत्त्वाच्या आणि जनहिताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी होणार आहे. शौर्य पाटील आत्महत्या प्रकरण, विमा कंपन्या आणि बँकांकडून होणारी कथित मनमानी, तसेच सामान्य नागरिकांशी संबंधित अन्य प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकांच्या घोषणेनंतर ही भेट होत असल्याने तिचे राजकीय अर्थही लावले जात आहेत. मात्र, पक्षाच्या सूत्रांनी ही भेट पूर्णपणे राज्यातील नागरिकांच्या प्रश्नांवर केंद्रित असल्याचे स्पष्ट केले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य पातळीवरील घडामोडींवर राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
___








