Power is yours, expectations are from Pawar : सत्ता तुमच्याकडे, अपेक्षा मात्र पवारांकडूनच!
Baramati : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. बारामतीत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सरकारला जाब विचारला. “300 खासदार, 250 आमदार तुमच्याकडे असताना सगळ्यांच्या अपेक्षा शरद पवारांकडूनच का असतात? शरद पवारांकडे फक्त 10 आमदार आणि 8 खासदार आहेत. तरीही लोकांच्या अपेक्षा त्यांच्याकडूनच असतात. सत्तेत असलेल्यांनीच आरक्षण दिलं पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सुळे म्हणाल्या, “आम्ही सकारात्मक आहोत, पण सरकार असंवेदनशील आहे. विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं. आता ते सत्तेत आहेत, त्यामुळे जबाबदारी त्यांचीच आहे. मुख्यमंत्री एक पाऊल पुढे टाकून जरांगे पाटलांशी थेट चर्चा करावी. तसेच सर्वपक्षीय बैठक बोलावून या प्रश्नाला तोडगा काढावा.”
पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओमध्ये फडणवीस म्हणताना दिसतात, “जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतो, जिथे करायचं नसतं तिथे मार्ग निघत नाही.” त्यावर टीका करत सुळे म्हणाल्या, “आज सत्ता असूनही मार्ग निघत नाही, याचा अर्थ इच्छाच नाही. हा प्रश्न कायद्याचा नाही, इच्छाशक्तीचा आहे.”
अजित पवारांबाबत विचारल्यावर त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. “वडीलधाऱ्यांवर बोलायचं नाही, ही माझ्या आईची शिकवण आहे,” असं सांगत त्यांनी मुद्दा टाळला. “सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी असते, घरं आणि पक्ष फोडण्यासाठी नाही. सत्ता ज्यांच्याकडे आहे, त्यांनी घटनादुरुस्तीचा प्रस्ताव आणावा. आम्ही ताकदीनं सोबत राहू,” असं सांगत त्यांनी सरकारला सल्ला दिला.
मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “सुव्यवस्था राखणं ही गृह विभागाची जबाबदारी आहे.” तसेच, शरद पवार यांच्यावर वारंवार होणाऱ्या टीकेबद्दल प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं, “शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय मोठी बातमी होत नाही, म्हणून अनेक जण त्यांच्यावर बोलतात.”