Suraj Chouhan : अखेर सूरज चव्हाण गुपचूप पोलीस ठाण्यात हजर

Police shrouded action in secrecy, granted bail in the early morning : पोलीसांनी कारवाईवर टाकला गुप्ततेचा पडदा, पहाटेच जामीन मंजूर

Latur : राजकारणात सध्या गाजत असलेल्या मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राजीनामा दिलेला युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण अखेर गुपचूपपणे पोलिसांना शरण आला. विशेष म्हणजे रात्री उशिरा पोलीस ठाण्यात हजर झालेल्या चव्हाणला पहाटेच जामीनही मंजूर करण्यात आला, त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना आणि आरोपांना उधाण आले आहे. पोलिसांच्या या गुप्त कारवाई मुळे आणि तत्काळ दिलेल्या जामीनामुळे शेतकरी संघटनांमध्ये तीव्र नाराजी आहे.

लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नुकतीच जोरदार झटापट झाली. यामध्ये छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांच्यावर हाताचा बुक्क्यांनी हल्ला करण्यात आल्याचा आरोप सूरज चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. सूरज चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष असून, अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. 2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीनंतर आमदारांना परत आणण्यामध्येही त्यांचा मोलाचा वाटा होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्यांमध्ये सूरज चव्हाण पहिल्या दहामध्ये होते. त्यांचं मूळ गाव लातूर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ आहे.

Hani trap case : कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीबद्दल चिंता !

 

मारहाण प्रकरणात सुरज चव्हाण फरार होते. मात्र, शनिवारी मध्यरात्री त्यांनी अचानक पोलीस ठाण्यात हजेरी लावली. त्यानंतर पहाटेच जामीन मंजूर करण्यात आला. या सर्व प्रक्रियेमध्ये लातूर पोलिसांनी कमालीची गुप्तता राखल्यामुळे, प्रकरणावर राजकीय दबाव असल्याचा आरोप होतो आहे. छावा संघटनेसह शेतकरी संघटनांनी या प्रकारावर तीव्र निषेध व्यक्त केला आहे. पोलिसांनी आरोपींना उशिरा शरण येऊनही तत्काळ जामीन दिला, ही बाब अत्यंत संशयास्पद असून, पोलीस प्रशासनावर दबाव असल्याची टीका संघटनांनी केली आहे. संपूर्ण घटनेमुळे पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. भाजप, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडूनही या प्रकरणावरून अजित पवारांवर आणि पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत.

____