Take action against banks for delay in disbursement of crop loans : मनसे नेत्याची फौजदारी दाखल करण्याची मागणी
Buldhana रब्बी हंगाम संपत आला आहे,तरी केवळ ७ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात ६९ हजार २०० शेतकऱ्यांना ७०० कोटींचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र अद्याप केवळ फक्त ४ हजार ७३७ शेतकऱ्यांना ६२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील ९३ टक्के शेतकरी रब्बी हंगामातील पीक कर्जापासून वंचित राहिले आहे.
शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवणाऱ्या बँकावर फौजदारी दाखल करा, अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांना अमोल रिंढे पाटील यांनी निवेदन दिले आहे.
अस्मानी सुलतानी संकटाशी सामना करताना बळीराजापुढे अनेक प्रश्न आवासून उभे आहे. अशा परिस्थितीत पीक कर्जाचे वेळेवर वाटप झाले तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात पीके घेता आली असती. मात्र प्रशासनाच्या पीक कर्ज वाटपाच्या संथ गतीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम हातातून गेला आहे. पीक कर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँकावर फौजदारी दाखल करुन वंचित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी केली आहे.
खरीप हंगामातही पीक कर्ज वाटप करण्यात मोठ्या प्रमाणात दिरंगाई झाल्याने हजारो शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नव्हते. परिणामी शेतकरी सावकारांच्या दारात जावून किंवा खाजगी बँकांकडून कर्ज घेऊन पेरणी करतो. यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होवून आत्महत्येस प्रवृत्त होत आहे. मनसेच्या वतीने शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर आणण्यात आला आहे. या अगोदरही प्रशासनाला निवेदने देण्यात आली आहे.
सरकारने यापुढे पीककर्ज वाटप युध्दपातळीवर करुन दिरंगाई करणाऱ्या बँकावर कारवाई करावी, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल ,असा इशारा अमोल रिंढे पाटील यांनी दिला आहे