Voter registration starts from today; new list will be prepared : नव्याने यादी तयार होणार; राजकीय पक्षांची धावपळ वाढली
Amravati विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. मतदार यादीची नवी प्रक्रिया आज, मंगळवार, दि. ३० सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यापूर्वी २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत ३५,६२२ मतदार होते आणि त्यापैकी तब्बल ८६.७३ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदार यादी पूर्णपणे नव्याने तयार केली जाणार असल्याने जास्तीत जास्त शिक्षकांची नोंदणी व्हावी, यासाठी राजकीय पक्ष प्रयत्नशील आहेत.
प्रत्येक वेळी विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी नव्याने तयार केली जाते. यंदा १ नोव्हेंबर २०२५ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी १२ सप्टेंबरला आदेश प्रसिद्ध केले. विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. श्वेता सिंघल या ३० सप्टेंबरला मतदार नोंदणीची अधिसूचना जारी करणार आहेत. अधिकाधिक नोंदणी ऑनलाइन पद्धतीने व्हावी, याकडे निवडणूक आयोगाचा विशेष भर आहे.
Manikrao Thakre : बोल घेवड्या सरकारचे वेळकाढू धोरण; काँग्रेस नेत्याची टीका
यानंतर १५ आणि २५ ऑक्टोबरला पुन्हा सूचना प्रसिद्ध होतील. पुढील प्रक्रियेनंतर ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. या निवडणुकीत उमेदवारांना मतदारांकडून पसंतीक्रमाने मतदान मिळते. तसेच या निवडणुकीसाठी निवडणूक खर्चावर कोणतीही मर्यादा नसल्याने यंदाच्या दिवाळीनंतर राजकीय वातावरणात जोरदार “फटाके” फुटण्याची शक्यता आहे.
१ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक १०,३८६ मतदार होते. त्यापाठोपाठ बुलढाणा ७,४८४, यवतमाळ ७,४६९, अकोला ६,४८० आणि वाशिम जिल्ह्यात ३,८१३ मतदार होते. त्यावेळी २६,०६० पुरुष व ९,५६२ महिला अशी एकूण ३५,६२२ मतदारांची नोंद होती. यातील ३०,८९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
Local Body Elections : अतिवृष्टी, पूरस्थितीचा फटका; निवडणुका पुढे ढकलल्या!
मतदार नोंदणीसाठी हे हवे
मतदार हा संबंधित मतदारसंघातील रहिवासी असावा. अर्हता दिनांकापूर्वी सहा वर्षांपैकी किमान तीन वर्षे माध्यमिक स्तरावर शिक्षक म्हणून कार्यरत असल्याचे संस्थाप्रमुखांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. विनाअनुदानित शाळांसाठी जिल्हा शाळा निरीक्षकांचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. तसेच निवृत्त शिक्षकांनाही अर्हतेच्या निकषांनुसार मतदार नोंदणी करता येईल, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजीराव शिंदे यांनी दिली.