Workshops for headmasters to curb bogus names : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार नोंदणी सुरू
Amravati अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी मतदार नोंदणी प्रक्रिया ३० सप्टेंबरपासून सुरू झाली असून, यासाठीची अंतिम तारीख ६ नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या निवडणुकीत बोगस मतदारांचा समावेश रोखण्यासाठी मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
मागील निवडणुकीत अनेक अपात्र व्यक्तींचा मतदार यादीत समावेश झाल्याचे आरोप झाले होते. यामुळे निकालावर परिणाम झाला, तसेच पराभूत उमेदवाराने न्यायालयात धाव घेतली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदणी प्रक्रिया काटेकोर करण्यासाठी ही उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
Dhammachakra Pravartan Din : पहिल्याच दिवशी घेतली पाच हजार उपासकांनी दीक्षा !
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, या निवडणुकीतील मतदार फक्त माध्यमिक शिक्षक असतात. त्यांची नावे मुख्याध्यापकांमार्फत मागवूनच अंतिम यादीत समाविष्ट केली जातील. यापूर्वी शिक्षक नसतानाही शाळेतील लिपिक, शिपाई आणि बस चालकांची नावे मतदार यादीत आल्याचे आढळून आले होते. यामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
या वेळी मुख्याध्यापकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्या स्वाक्षरीशिवाय कोणत्याही शिक्षकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होऊ शकणार नाही. त्यांनी संस्थाचालक किंवा इतर कुणाच्याही दबावाखाली न येता सत्य माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. अन्यथा निवडणूक आयोगाच्या तरतुदीनुसार संबंधितांवर कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे आणि नायब तहसीलदार प्रवीण देशमुख आदी अधिकारी उपस्थित होते.
Dussehra Festival Event : आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या भूमिकेकडे लक्ष !
या निवडणुकीसाठी मतदार होण्यासाठी १ नोव्हेंबर २०२५ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. या तारखेपूर्वी किमान तीन वर्षे नोकरी केलेला शिक्षक पात्र ठरेल. तो पूर्णवेळ किंवा अर्धवेळ असला तरीही मतदार म्हणून नोंदणीस पात्र असेल. तथापि, संबंधित शिक्षकांना शाळेकडून मिळणारे वेतन हे शासनमान्य वेतन यादीत आहे का, याची पडताळणी करण्यात येणार आहे. वेतन पडताळणी पथकाच्या यादीशी तुलना करून अर्जांची छाननी केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.








