Citizens of Akola return safely from Kashmir : काश्मीरमधून सुखरूप परतलेल्या अकोल्याच्या पर्यटकांची आपबीती
Akola पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी अकोल्याचे ३१ पर्यटक सोनमर्ग येथे होते. हल्ल्याची माहिती मिळताच सर्वजण घाबरले. त्यांनी तत्काळ बसमध्ये बसून आपल्या हॉटेलमध्ये आश्रय घेतला. पुढचे दोन दिवस त्यांनी भीतीच्या वातावरणात जागून काढले. घरी सुखरूप परतल्यावर त्यांनी आपले थरारक अनुभव कथन केले.
अकोल्यातील एका ‘टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स’ संस्थेच्या माध्यमातून हे पर्यटक काश्मीरला गेले होते. २५ एप्रिलला श्रीनगरहून विशेष विमानाने मुंबई व २६ एप्रिलला खासगी बसने ते अकोल्यात पोहोचले. स्वागतावेळी नातेवाईकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते.
पर्यटकांपैकी अंबादास सप्रे व पंकज साहू यांनी सांगितले की, “सोनमर्गमध्ये असताना पहलगाममधील हल्ल्याची माहिती मिळाली. सर्वजण घाबरून बसमध्ये बसलो व हॉटेलमध्ये परतलो. रात्री झोपच लागली नाही. प्रत्येक खोलीबाहेर जाऊन पाहणी करत होतो.” दुसऱ्या दिवशी सर्वांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला.
या काळात खासदार अनूप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर तसेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संपर्कामुळे पर्यटकांना दिलासा मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्हिडीओ कॉलद्वारे थेट संवाद साधून धीर दिला.
‘काश्मीरला पुन्हा नाही’
या थरारक अनुभवामुळे काही पर्यटकांनी अमरनाथ यात्रा रद्द केली असून, भविष्यात काश्मीरला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. ‘टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स’चे संचालकही आता काश्मीरच्या सहली टाळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फारूख भाईंचा आधार
श्रीनगरमध्ये फारूख भाई यांच्या हॉटेलमध्ये पर्यटक थांबले होते. त्यांनी सर्वांची सुरक्षिततेची हमी दिली व सकाळ-संध्याकाळ भेटून विचारपूस केली.
Terrorist attack in Pahalgam : या निर्णयाने पाकिस्तानी नागरिकांना दिलासा
पर्यटकांचे थरारक अनुभव
“सुरुवातीला उत्साहात सुरू झालेली यात्रा दहशतवादी हल्ल्यामुळे थरारक ठरली. सरकारच्या मदतीने आम्ही सुखरूप परतलो,” असे प्रेरणा संदीप सकळकळे यांनी सांगितले.
“आमच्या आयोजकांनी खंबीरपणे साथ दिली,” असे सुनीता अंबारखाने व वर्षा मराठे यांनी नमूद केले.
“सरकारच्या तत्परतेमुळे सुरक्षित परतता आलो,” अशी भावना अंबादास सप्रे व पंकज साहू यांनी व्यक्त केली.