On the first day of the new year : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दुहेरी हत्याकांड
nagpur इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारा मुलगा वारंवार नापास होत असल्यामुळे आई-वडिलांनी त्याला विचारणा केली. आईवडिलांचे नापास झाल्याबाबतचे टोमणे सहन न झाल्यामुळे मुलाने आईवडिलांचा खून केला. अगदी क्षुल्लक कारणावरुन सख्ख्या मुलाने असे गंभीर पाऊल उचलल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कपीलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे दुहेरी हत्याकांड उघडकीस आले.
लिलाधर डाखोळे आणि अरुणा डाखोळे असे खून झालेल्या दाम्पत्यांची नावे आहेत. तर उत्कर्ष लिलाधर डाखोळे (24, खसाळा, कपीलनगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या हत्याकांडाचा मोठ्या शिताफीने छडा लावत मुलाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिलाधर डाखोळे हे कोराडी वीज केंद्रात टेक्निशियन पदावर नोकरीवर होते तर पत्नी अरुणा डाखोळे या संगीता विद्यालयात शिक्षिका होत्या. त्यांना मुलगा उत्कर्ष (24) आणि मुलगी सेजल (21) अशी दोन मुले आहेत. उत्कर्ष हा इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकतो तर बीएएमएसच्या प्रथम वर्षाला शिकते.
उत्कर्ष हा गेल्या दोन वर्षांपासून वारंवार नापास होत होता. त्यामुळे शिक्षिका असलेल्या आईने त्याच्यावर आरओरड करीत बैलवाड्याला असलेली शेती कसण्यास सांगितले होते. तर वडिल लिलाधर यांनी मुलाला इंजिनिअरिंग झेपत नसेल तर आयटीआय किंवा पॉलिटेक्निकला प्रवेश घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्याला आईवडिलांचा राग आला होता. घरात वारंवार त्याला शिक्षण सोडून देऊन शेती करण्यासाठी टोमणे मारण्यात येत होते. 25 डिसेंबरला वडिलांना उत्कर्षला मारहाण केली आणि शिक्षण सोडण्यास सांगितले होते. बैलवाड्यातील घरात राहूून शेती सांभाळण्यास सांगितले होते. आईने त्याची बॅग भरुन ठेवली होती. आता इंजिनिअरिंग सोडून पॉलिटेक्निकला प्रवेश घ्यावा लागेल, अशी हिन भावना त्याच्या मनात आल्यामुळे तो अस्वस्थ होता.
आईच्या खूनानंतर तासाभराने वडिलांचा खून
आपले शैक्षणिक भवितव्याशी आईवडिलांनी खेळ केल्याची भावना उत्कर्षच्या मनात खदखदत होती. त्यामुळे त्याने आईवडिलांचा काटा काढण्याचा कट रचला. गेल्या 26 डिसेंबरला विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यात आई मग्न होती. उत्कर्षने आईचा दोन्ही हातानी गळा आवळून खून केला. त्यानंतर तो आईच्या मृतदेहाजवळ बसून होता. तासाभराने त्याचे वडिल घरी आले. वडिल घरी आल्यावर ते सोफ्यावर बसले. उत्कर्षने मागून येऊन वडिलांच्या मानेवर चाकूने वार केला. दोघांचेही मृतदेह घरात पडून होते आणि उत्कर्षने घर बंद करुन बाहेर निघून गेला.
असे आले हत्याकांड उघडकीस
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लिलाधर यांना शुभेच्छा देण्यासाठी एक मित्र घरी आला. त्याला घरातून दुर्गंधी आली. त्याने शेजाऱ्यांना माहिती दिली. ठाणेदार महेश आंधळे यांनाही माहिती देण्यात आली. पोलिसांनी घराचे दार तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यांना अरुण आणि लिलाधर यांचे मृतदेह दिसले. मुलगा आणि मुलीबाबत चौकशी केली असता दोघेही बोखारा येथे राहणाऱ्या काकांकडे गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोन्ही भावंडाना घरी आणले. पोलिसांना उत्कर्षच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. त्यामुळे पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने आईवडिलांचा खून केल्याची कबुली दिली.