The co-operative sector will get modern touch : विदर्भातील सहकार चळवळ पुनरुज्जीवित करण्याचा सहकार मंत्र्यांचा निर्धार
Gondia सहकार क्षेत्राशी संबंधित सर्व विभागांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय विविध डिजिटल प्रक्रियांच्या माध्यमातून सहकार क्षेत्राला मॉडर्न टच देण्याचा प्रयत्न भविष्यात होणार आहे, अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री तसेच गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.
सहकार क्षेत्राचे बळकटीकरण कसे करता येईल, या अनुषंगाने केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली. त्यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. याशिवाय काही ठोस निर्णय घेऊन सहकार क्षेत्राचे लवकरच बळकटीकरण केले जाणार आहे, असेही बाबासाहेब पाटील म्हणाले. सहकार मंत्री पाटील हे शनिवारी (२५ जानेवारी) गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकरी व सहकारी संस्थांना बळ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी सेवा सहकारी संस्था, सहकारी तत्त्वावरील बँका, पतसंस्थांना अल्पदाराने कर्ज पुरवठा, त्यांच्या संगणकीकरणासाठी निधी, सेवा सहकारी सोसायट्यांना गोदाम बांधकामासाठी वेगळा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विविध सेवा सहकारी सोसायटीमध्ये कार्यरत गट सचिवांना जिल्हा बँकांशी कसे जोडता येईल. त्यांची अनेक दिवसांपासूनची अडचण कशी दूर करता येईल, या दृष्टीने सुद्धा पाऊले उचलण्यात येणार असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले
विदर्भात पूर्वी सहकार क्षेत्राचे भक्कम जाळे होते. पण अलीकडच्या काही वर्षांत विदर्भातील सहकार चळवळीवर मरगळ आली आहे. ही मरगळ दूर करून विदर्भातील सहकार क्षेत्राला पुन्हा बळकट करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.