Online gambling addiction to youth : ऑनलाईन जुगाराचा तरुणाईला विळखा
Wardha लहान मुलांच्या उन्हाळ्यातील सुट्या अथवा रेल्वे प्रवासादरम्यान टाइमपास म्हणून खेळले जाणारे खेळ म्हणजे लुडो, सापशिडी, तीन पत्ती अशी ओळख होती. आता याच खेळांचे इंटरनेटच्या युगात ऑनलाइन स्वरूपात जुगारामध्ये रूपांतर झाले आहे. मोठ्या प्रमाणात युवा पिढी या ऑनलाइन जुगाराकडे आकर्षित झाली आहे. पण या ‘ऑनलाइन गेम’च्या नादात अनेकांच्या आयुष्याचा ‘खेळ’ होत आहे.
यामध्ये किशोरवयीन मुलांचे प्रमाणदेखील मोठे आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे स्किल गेमच्या नावाखाली हे प्रकार सुरू आहे. पण याकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. युजर्सचा आयडी तयार झाल्यानंतर ॲपच्या नियमानुसार रक्कम डिपॉझिट करण्यास सांगण्यात येते. ही रक्कम जमा करण्यासाठी ॲपचा ॲडमिन क्यूआर कोड किंवा त्याचे बँक डिटेल्स पाठवतो. ही रक्कम जमा केल्यानंतर युजर्सला जुगार खेळता येतो. यात युजर्स १०० रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत रक्कम डिपॉझिट करू शकतो.
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला!
सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मसह विविध चॅनलवर सध्या नियमित ऑनलाइन जुगाराच्या जाहिराती दिसून येतात. यामध्ये तीनपत्ती, जंगली रमी, लुडो, तसेच क्रिकेटशी संबंधित खेळांच्या जाहिरातींचा देखील समावेश आहे. जाहिरातींच्या माध्यमातून या जुगारांच्या खेळाकडे आकर्षित करून तरुणाईला भुरळ घालण्यात येत आहे. विशेष म्हणजे स्किल गेमच्या नावाखाली युजर्स यात ओढले जातात. झटपट पैसे मिळवण्याच्या नादात तरुणाई या ऑनलाइन जुगाराकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे.
मोबाइलमधील प्ले-स्टोअरवरून अथवा इंटरनेटद्वारे विविध साइटवरून संबंधित ऑनलाइन गेमचे ॲप डाउनलोड करता येतात. यानंतर ॲपवर स्वतःचा आयडी तयार करावा लागतो. यासाठी देखील दोन पर्याय आहेत. पहिल्या प्रकारात पूर्वीपासून त्यावर अकाउंट असलेली मंडळी नवीन युजर्सचे नाव आणि मोबाइल क्रमांक ॲपच्या ॲडमिनला रेफर करतात. यानंतर ॲडमिन नवीन युजर्सला संपर्क साधून त्याचा आयडी तयार करतो. तर दुसऱ्या प्रकारात जाहिरातींमध्ये दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधल्यास समोरील व्यक्ती आयडी तयार करून देते.
Mahayuti Government : रात्रीच्या पार्ट्या महागणार! लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी तळीरामांवर बडगा?
आपल्या आयडीवर लॉगिन केल्यानंतर युजर्स पाहिजे त्या खेळाला जुगार खेळण्यासाठी निवडू शकतो. यामध्ये त्याने जितकी रक्कम आयडीवर डिपॉझिट केली असेल. त्या प्रमाणात तो खेळू शकतो. जितकी रक्कम लावली, त्याच्या दुप्पट रकमेचे आमिष खेळाडूला दाखवले जाते. यानंतर गेममध्ये युजर्स जिंकला तर त्याने जिंकलेली रक्कम तो विड्रॉल करून घेऊ शकतो. यासाठी संबंधित ॲपची दुसरी टीम विड्रॉलचे काम करते.
या टीमच्या व्हॉटसॲप क्रमांकावर युजर्सचा आयडी क्रमांक आणि बँक खात्याची माहिती पाठवावी लागते. यानंतर काही वेळात त्याच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. युजर्स हरल्यास त्याने लावलेली रक्कम गमवावी लागते. यातूनच आर्थिक फटका बसण्याच्या आणि त्यातून जिवाचे बरेवाईट करण्याच्या घटना घडत आहेत.