The Shop on mobile van will be free : फिरत्या वाहनावरील दुकान मोफत; ६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
Nagpur दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना हरित ऊर्जेवर Green Energy चालणारे फिरत्या वाहनावरील दुकान मोफत देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी येत्या ६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाकडून करण्यात आले आहे.
राज्य शासनाने १० जून २०१९ रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य वित्त व विकास महामंडळाच्या स्तरावरून ही योजना राबविण्यात येत आहे. दिव्यांगांना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन रोजगार निर्मितीला चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कुटंबासोबत जीवन जगण्यासाठी सक्षम करणे हा या योजनेमागील उद्देश आहे.
http://registermshdfc.co.in या संकेतस्थळावर २२ जानेवारीपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ६ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक योगिता काकडे, वसुली निरीक्षक वर्मा तेलंग व जनक शाहू यांनी केले. त्यासाठी हेल्पलाइन क्रमांक : ९०९०११८२१८, ७८२०९०४०८१ यावर किंवा evehicle.mshfdc@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधायचा आहे.
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४० टक्के असावे. जिल्हाशल्य चिकित्सक यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र हवे. अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे यूडीआयडी प्रमाणपत्र हवे. अर्जदार १८ ते ५५ वयोगटातील असावा. मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करू शकतात. दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख पेक्षा अधिक नसावे, असे निकष आहेत.
लाभार्थ्याची निवड करताना जास्त दिव्यांगत्व असणाऱ्याला प्राधान्य दिले जाईल. अर्जदार हा शासकीय-निमशासकीय-मंडळे-महामंडळे येथील कर्मचारी नसावा. लाभार्थी हा दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा थकबाकीदार नसावा. इतर कोणत्याही योजनेंतर्गत मोफत ई-व्हेईकल प्राप्त झालेल्या व्यक्तीला या योजनेंतर्गत लाभ घेण्यास अपात्र ठरविण्यात येईल.