Thombre Vs Chakankar : चाकणकरांविषयी बोलणं दुसऱ्या रुपालीला महागात !

NCP issues disciplinary notice to spokesperson Thombar : राष्ट्रवादीकडून प्रवक्त्या ठोंबरेंना शिस्तभंगाची नोटीस

Pune : राज्यातील महिला राजकारणात सध्या ‘रुपाली विरुद्ध रुपाली’ संघर्ष रंगला असून, या वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत तणावाचं वातावरण निर्माण केलं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांच्यावर अखेर पक्षाने कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ठोंबरे यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली असून, पक्षातील अंतर्गत संघर्षावर स्पष्ट भूमिका घेतली आहे.

मागच्या काही महिन्यांपासून रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यात मतभेद तीव्र झाले होते. ठोंबरे या पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होत्या आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना प्रदेश प्रवक्त्या पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी वेळोवेळी रुपाली चाकणकर यांच्या भूमिकांवर सार्वजनिक टीका केली. विशेषतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून चाकणकर यांचे वर्तन आणि निर्णय यांवर त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केले होते.

Local Body Elections : महायुती टिकवा, कार्यकर्ता वाचवा! शिंदे सेनेचे भाजपला आवाहन

 

या सातत्यपूर्ण टीकेमुळे पक्षनेतृत्वाने अखेर ठोंबरे यांच्या विरोधात कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यांना शिस्तभंगाची नोटीस देत सात दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या नोटीशीवर ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे प्रतिक्रिया देत म्हटलं, “खुलासा देण्यासाठी मला केवळ सात दिवस दिले आहेत. हगवणे प्रकरणापासून आमच्या भगिनी कैलासवासी डॉ. संपदा मुंडेंच्या चारित्र्यहननापर्यंत मी सविस्तर उत्तर देईन. ज्यांनी मयत भगिनीचं चारित्र्यहनन केलं, त्यांच्याबद्दल नेमका कोणता खुलासा द्यायचा?”

दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक प्रकरण गाजलं. माधवी खंडाळकर या महिलेने फेसबुक लाईव्हद्वारे रुपाली ठोंबरे यांनी गुंड पाठवून आपली मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर तिने हा दावा मागे घेतला, पण तिसऱ्या व्हिडिओत पुन्हा म्हणाली की दुसरा व्हिडिओ तिने दबावाखाली केला होता. ठोंबरे यांनी या प्रकरणात चाकणकर यांच्यावरच कटकारस्थानाचा आरोप केला होता.

Sanjay Gaikwad : शिंदेंचा उमेदवार पाडण्यासाठी भाजपनेत्याने १ कोटी रुपये घेतले

रुपाली ठोंबरे या त्यांच्या आक्रमक स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. मात्र, त्याच स्पष्टवक्तेपणाचा फटका आता त्यांना बसल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या वादात पक्षशिस्त जपण्यासाठी पाऊल उचलल्यामुळे, पक्षातील महिला नेतृत्वातील फूट अधिकच स्पष्ट झाली आहे. रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे या दोघींच्या संघर्षामुळे पक्षात ‘महिला विरुद्ध महिला’ संघर्ष तीव्र झाला असून, त्याचे राजकीय परिणाम पुढील काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.