Clash over assault case reached peak amid allegations, counter-accusations : आरोप प्रत्यारोपांत मारहाण प्रकरणावरून संघर्ष शिगेला !
Pune: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आणि माधवी खंडाळकर यांच्यातील वाद आता कायदेशीर पातळीवर पोहोचला असून ठोंबरेंनी खंडाळकरांना तब्बल 10 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे. काही दिवसांपूर्वी माधवी खंडाळकर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे रुपाली ठोंबरे पाटील यांनी गुंड पाठवून स्वतःवर अमानुष मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला होता.
रक्तबंबाळ अवस्थेतील त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने मोठा राजकीय वाद पेटला. आरोप ऐकून ठोंबरेंनी तात्काळ प्रतिक्रिया देत ज्या दिवशी मारहाणीचा आरोप करण्यात आला त्यादिवशी त्या बीडमध्ये असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर माधवी खंडाळकरांनी आधी माफी मागणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला, मात्र नंतर त्यांनी संपूर्ण प्रकरणाला यू-टर्न देत हा व्हिडिओ ठोंबरेंनी बळजबरीने शूट करून घेतल्याचा दावा केला. त्यामुळे दोघींमधील संघर्ष आणखी तीव्र झाला.
Thackeray alliance : मनसे – ठाकरे गटाच्या जागावाटपाचा चर्चा निर्णायक टप्प्याकडे
फेसबुक लाईव्हद्वारे मारहाणीचा आरोप करणाऱ्या खंडाळकर यांनी नंतर गैरसमजुतीतून वाद वाढल्याचे सांगत आम्ही जुने परिचित असून कुटुंबीय पातळीवर वाद मिटवत आहोत, असं विधान केलं. मात्र त्यापूर्वी त्यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली होती.
प्रकरणाची तीव्रता वाढत असताना रुपाली ठोंबरे यांनी बीडमधून दिलेल्या व्हिडिओ संदेशात त्या पुण्यात नव्हत्या हे स्पष्ट करून संबंधित वाद त्यांना माहिती नसल्याचे सांगितले. दोन्ही पक्ष पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असल्याचे सांगत कोणाची चूक आहे ते तपासात स्पष्ट होईल, असेही त्यांनी म्हटले होते.
MH Motors scam : नागपुरात एमएच मोटर्सचा कोट्यवधींचा घोटाळा; डीसीपींची तात्काळ कारवाई !
या संपूर्ण घडामोडींनंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी खंडाळकरांना कायदेशीर नोटीस पाठवत 10 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकला असून या प्रकरणाचा निकाल आता न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून राहणार आहे. सोशल मीडियावरील आरोप, त्यानंतरचे यू-टर्न आणि कायदेशीर कारवाईमुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
_____








