MLA Shweta Mahale’s security increased : जीवे मारण्याच्या धमकीनंतर उचलले पाऊल
Buldhana चिखली मतदारसंघाच्या भाजप आमदार श्वेता महाले पाटील यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. एक सशस्त्र पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासह ४ कर्मचारी आणि एस्कॉर्ट वाहन त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात अज्ञात आरोपीने श्वेता महाले यांना जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र पाठवले होते. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप आरोपीचा शोध लागलेला नाही. तथापि, आमदार महाले यांच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी विशेष सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे आदेश दिले आहेत.
या धमकीच्या पत्रातील भाषा अत्यंत क्रूर आहे. त्यामुळे जनमानसातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. चिखली मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे राबवून आमदार महाले यांनी मतदारसंघाचा कायापालट केला आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी होत होती, जी आता राज्य शासनाने मान्य केली आहे.
इतर नेत्यांची सुरक्षा कमी केली
एकीकडे जिल्ह्यातील शिंदे सेनेचे माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांची सुरक्षा पूर्णतः काढून टाकण्यात आली आहे. तसेच, बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. याउलट, भाजप आमदारांची सुरक्षा वाढवल्याचे दिसून येत आहे.
Vidarbha Farmers : ६५% पीक नष्ट! ‘डेटसुकी’ रोगामुळे संत्रा उत्पादक संकटात!
आंदोलनही झाले होते
आमदार श्वेता महाले यांना अज्ञात व्यक्तीने पत्राद्वारे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे चिखली शहर आणि तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी नागरिक आणि कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाकडे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने चिखली पोलिस ठाण्यावर दाखल झाले होते. गेल्या आठवड्यात खामगाव चौफुली येथे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले होते.