Later Amol Mitkari took a U-turn and expressed his regret : नंतर यू-टर्न घेत अमोल मिटकरींनी व्यक्त केली दिलगिरी
Mumbai : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील फोनवरील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले होते. या वादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कृष्णा यांच्या नेमणुकीबाबत शंका उपस्थित करत थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे चौकशीची मागणी करणारे पत्र लिहिले होते. मात्र, या मागणीवरून निर्माण झालेल्या वादानंतर आता मिटकरींनी यू-टर्न घेत सोशल मीडियावर दिलगिरी व्यक्त केली आहे.
अमोल मिटकरी यांनी शनिवारी एका पोस्टद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी लिहिले की, “सोलापूर घटनेसंदर्भात केलेला ट्वीट मी बिनशर्त मागे घेत असून दिलगिरी व्यक्त करतो. ही माझ्या पक्षाची अधिकृत भूमिका नव्हती तर माझी वैयक्तिक भूमिका होती. आपल्या पोलीस दलाबद्दल आणि प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे.”
मिटकरींनी शुक्रवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाला पत्र लिहून अंजना कृष्णा यांनी सादर केलेल्या शैक्षणिक पात्रता, जात प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी केली होती. “पूजा खेडकर प्रकरणाप्रमाणेच अंजना कृष्णा यांच्या निवड प्रक्रियेतही घोळ असू शकतो,” असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे या अधिकाऱ्यांची संपूर्ण चौकशी करण्याची विनंती त्यांनी आयोगाकडे केली होती.
Mehkar Panchayat Samiti : सुनावणीसाठी एकाच दिवशी ९० अधिकारी–कर्मचारी अमरावतीत
माढा तालुक्यातील कुर्डू गावात मुरुम उत्खनन सुरू असल्याची तक्रार आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी (डीएसपी) अंजना कृष्णा कारवाईसाठी घटनास्थळी पोहोचल्या. गावकऱ्यांसोबत झालेल्या वादाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने अजित पवारांना फोन केला आणि तो कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र, त्यांना उपमुख्यमंत्री पवार यांचा आवाज ओळखता आला नाही. यावरून पवार आणि कृष्णा यांच्यातील संवाद चांगलाच चिघळला. पवारांनी कारवाई थांबवण्याचे आदेश दिले, मात्र कृष्णा ठाम राहिल्या. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद पेटला.
अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्यातील व्हिडीओ कॉलनंतर प्रकरणाने राजकीय रंग घेतला. त्यावरून अमोल मिटकरी यांनी चौकशीची मागणी केली होती. मात्र आता त्यांनी मागे हटत दिलगिरी व्यक्त केल्याने प्रकरणाला नवा वळण मिळाले आहे.
____