Breaking

Tribal Culture : ‘जय सेवा जय जय सेवा’चा गजर; दुमदुमले कचारगड

Kachargarh Yatra of tribals begins : गोंडी ध्वज फडकावून कोया पुनेम महोत्सवाला सुरुवात

Salekasa Gondia देशभरातील आदिवासी गोंड समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील कचारगड येथे दरवर्षी माघ पौर्णिमेला होणारी कचारगड यात्रेला प्रारंभ झाला आहे. मंगळवारी (दि. ११) यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आदिवासी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. कोया पुनेम महोत्सवाची विधिवत सुरुवात झाली. समितीचे अध्यक्ष दुर्गा प्रसाद कोकोडे यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार संजय पुराम यांनी गोंडवाना ध्वज फडकावला. विधिवतरीत्या कोया पुनेम महोत्सवाचे उद्घाटन केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष लायराकराम फेंडारकर, रमेश ताराम, दुर्गाप्रसाद कोकोडे, पं. स. सदस्या अर्चना मडावी, अंबरलाल मडावी, राजेंद्र बडोले यांच्यासह गोंडी धर्माचार्य व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. तत्पूर्वी, गोंडी धर्माचे भूमिकाल यांनी कोया पुनेम महोत्सवानिमित्त गोंडी परंपरेनुसार पूजन विधी पार पाडला. धनेगाववरून कचारगडकडे माता जंगो आणि बाबा लिंगो यांची पालखी नेण्यात आली. पालखीसोबत हजारोंच्या संख्येने आदिवासी भाविक सहभागी झाले.

कचारगड येथे माँ काली कंकाली आणि पहांदी पारी कुपार लिंगो यांची पूजा केल्यानंतर भाविकांच्या जयघोषाने गुफा परिसर दणाणले. धनेगाव येथे कार्यक्रम स्थळी संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. मंगळवारी दुसऱ्या दिवशी आदिवासी गोंड समाजाचे भाविक लाखोंच्या संख्येने आपल्या आद्य दैवतांना स्मरण आणि देवी देवतांचे पूजन करण्यासाठी कचारगडला उतरले.

बस, रेल्वे याशिवाय स्वतःच्या चार चाकी दुचाकी वाहनाने भाविकांनी कचारगडला येऊन गर्दी केली होती. धनेगाव ते कचारगड तीन किलोमीटरच्या परिसर भाविकांनी आणि त्यांच्या जय सेवा जय जय सेवा या जयघोषाने दुमदुमला होता.

जिल्हा प्रशासनाने कचारगड यात्रेदरम्यान भाविकांच्या सोयीसाठी व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध प्रकारच्या उपाययोजना व दक्षता घेतली आहे. ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आले आहे. याशिवाय पूर्व तयारी म्हणून अग्निशमन वाहनांची व्यवस्था केली आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्रास होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी रुग्णवाहिकेची व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच डाॅक्टर आणि आरोग्य कर्मचारीसुद्धा तत्पर ठेवण्यात आले आहेत. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन भाविकांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे. यामध्ये जनजाती चेतना समिती व विविध आदिवासी सेवा समिती सहभागी झाली आहे.