Trust is important in empowering a worker, Dhananjay Munde’s aggressive speech in Shirdi : कार्यकर्त्याला ताकत देताना विश्वास महत्त्वाचा, धनंजय मुंडेंचे शिर्डीत आक्रमक भाषण
Shirdi News : मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणाच्या आडून मला जाणीवपूर्वक, ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच जास्त वाईट वाटते, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथे सुरू असलेल्या नवसंकल्प शिबिराच्या व्यासपीठावरून मुंडंनी आक्रमक भाषण केले. ते म्हणाले, पक्षातील काही लोकदेखील दादांच्या कानाला लागून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. मात्र तरीही माझी भूमिका व वस्तुस्थितीची जाणीव दादांना आहे. त्यामुळे या कठीण काळातही पक्ष म्हणून दादा माझ्या पाठीशी उभे आहेत. आज कुणी निराधार व बिनबुडाचे कितीही आरोप करून मला अडकवण्याचा, माझा अभिमन्यु करण्याचा प्रयत्न केला तरीही उपयोग होणार नाही. कारण मी अभिमन्यु नाही, तर मी अर्जुन आहे. अजित दादांनी आता बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे, याचा आनंदच आहे.
Eknath Shinde : हिमाचल आणि जम्मू-काश्मीरचा उबाठाला जय महाराष्ट्र !
बीड जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात झालेली स्व.संतोष देशमुख यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक होती. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावरच लटकवले पाहिजे, हे माझे पहिल्या दिवसापासून स्पष्ट मत आहे. गुन्हेगारी ही एक नीच वृत्ती आहे. त्याला जात धर्म नसतो. मात्र या घटनेच्या आडून जात म्हणून एका समाजाला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवले जात आहे. सातत्याने आमची मीडिया ट्रायल केली जात आहे. याबद्दल धनंजय मुंडे यांनी खंत व्यक्त केली .
तुमच्या अंगावर कोणी आले तर त्याला आम्ही शिंगावर घेतले. पक्षात आल्यापासून आजवरच्या वाटचालीत आमचे नेते म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहिलो. अनेक प्रसंगी अजितदादांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला. तुमच्या अंगावर कोणी आले तर त्याला आम्ही शिंगावर घेतले. २०१४ -१९ या काळात विरोधी पक्षनेतेपदी काम केले. पक्षाच्या पडत्या काळात चार वेळा हल्लाबोल, परिवर्तन, शिवस्वराज्य यात्रांमध्ये सहभागी होऊन सबंध महाराष्ट्र पिंजून काढला. तत्कालीन सरकारला वाकवायचे काम केले.
२०१९ साली पहाटेची शपथ घेऊ नका हे मी सांगितले होते. ती शपथ त्यांनी घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली, अशी खंतही धनंजय मुंडे यांनी आज प्रथमच बोलून दाखवली. सामाजिक न्याय मंत्री म्हणून मी चांगले काम करून दाखवले. गाव – वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणे, ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ यांसारखे अनेक क्रांतिकारी निर्णय त्या काळात घेतले. ११ हजार कोटी रुपये पीकविमा एका वर्षात मिळवून देणारा कृषिमंत्री मी, मात्र त्यावरूनही टीका झाली. मात्र अर्धवट माहिती देऊन बदनामी करणारे लोक यावर बोलत नाहीत, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
Ajit Pawar : अजितदादांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्याचा पुण्यासारखा विकास होईल !
खरे दुखणे..
लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी गेलो होतो. त्यावेळी बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा वहिनींच्या प्रचारासाठी जाऊ नकोस, अन्यथा पुढे विधानसभेत त्याचा तुला त्रास होईल, असा सल्ला मला अनेकांनी दिला होता. मात्र तरीही मी गेलो. माझ्यासह अनेकांना विधानसभा निवडणुकीत ठरवून टार्गेट केले गेले.
मी माझ्या परळीच्या जनतेच्या आशीर्वादाने एक लाख चाळीस हजार मतांच्या लिडने निवडून आलो, त्याचीच पोटदुखी अनेकांना प्रकर्षाने झाली. ठाण्यात मी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला गेलो म्हणून तिथले नेते बीडमध्ये येऊन मला टार्गेट करत आहे, हेही उघड झाले. आहे. विधानसभा निवडणुकीत मी केवळ ५ दिवस पूर्णवेळ परळीत होतो, उर्वरित वेळेत मी पक्षाच्या अनेक उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या, बैठका घेतल्या. त्यातील बहुतांश उमेदवार निवडून आले, असेही मुंडे म्हणाले.
मी काम करणारा कार्यकर्ता..
मी सतत काम करणारा एक कार्यकर्ता आहे, नेता फक्त नावाला आहे. माझ्यातला कार्यकर्ता कधीच मरणार नाही. मी एक निष्ठावान कार्यकर्ता आहे. पक्ष नेतृत्वाने पाँडिचेरीमध्ये जाऊन पक्ष विस्ताराचे काम कर म्हंटले तर तिथे जाऊनही मी काम करेल. पक्षाला सुद्धा कार्यकर्ताभिमुख व्हावे लागेल. कार्यकर्त्याला ताकत देताना संपूर्ण विश्वासदेखील ठेवणे आवश्यक आहे. तेव्हाच पक्ष संघटना मजबूत होईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षाचा कार्यकर्ता कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
HSC SSC Hall ticket Controversy : विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर जातीचा उल्लेख!
बीड जिल्हा अन् सामाजिक सलोखा
स्व.संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर झालेल्या मीडिया ट्रायल, सोशल मीडियावरील चिखलफेक, साधलेले राजकारण अशा अनेक गोष्टींनी जिल्ह्याचे सामाजिक ऐक्य धोक्यात आले आहे. आपला पक्ष शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे आता आमच्या बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा जपण्याची जबाबदारीसुद्धा सर्वांना घ्यावी लागेल.
ऊसतोड करून, कष्ट करून, कोरडवाहू शेती करून जगणारे आम्ही सामान्य लोक आहोत. आमचा जिल्हा बिहार आणि आमची परळी तालिबान, अशीच बदनामी सुरू राहिली, तर पुढच्या महिन्यात महाशिवरात्री आहे. बारा ज्योति्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ यांच्या दर्शनाला भाविक येतील का, अशी भीती वाटत असल्याचे सांगून परळीची बदनामी थांबवा, असे कळकळीचे आवाहन मुंडेंनी केले.