BJP, Congress MLAs Clash Erupts in East Nagpur : भाजप कार्य़कर्त्यांनी अभिजित वंजारी यांच्या कार्यालयावर शाई फेकल्याचे प्रकरण तापले
Nagpur : पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. आंदोलनाचे निमित्त करत भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी यांच्या कार्यालयावर शाईफेक केली. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी घडली. त्यानंतर काल (१ सप्टेंबर) दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदार वंजारी यांच्या कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनीच शाईफेक केली, असा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आणि पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या घरावर धाऊन जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी खोपडे यांच्या घराला सुरक्षा पुरवली. बॅरीकेटींग करून कार्यकर्त्यांना अडवले. दरम्यान आपल्या नेत्याचे कार्यालय वाचवण्यासाठी भाजपचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले. यावेळी आमदार खोपडे यांचे घर असलेल्या सतरंजीपुरा येथे मोठा तणाव निर्माण झाला होता.
काँग्रेसचे नेते अभिजित वंजारी हे विधान परिषद सदस्य आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांना आमदार म्हणून घोषीत केले आहे. ते आमदार म्हणून आपले काम करत आहेत. अशात त्यांच्या कार्यालयावर शाईफेक का करण्यात आली, याचे उत्तर घेण्यासाठी आम्ही आज येथे आलो आहोत, असे काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.
Reservation controversy : मराठ्यांना ओबीसी आरक्षण दिल्यास लाखोंचा ….
वंजारी यांनी त्यांच्या कार्यालयाच्या फलकावर ‘आमदार पूर्व विधानसभा क्षेत्र’ असं लिहिलं आहे. ते पूर्व नागपूरचे आमदार आहेत, असे दाखवून नियमांची पायमल्ली करत आहेत. मुळात त्यांचा मतदारसंघ पूर्व नागपूर नाही, तर नागपूर जिल्हा आहे. त्यामुळे त्यांना ‘नागपूर जिल्हा’ आणि ‘विधान परिषद’ असं लिहायला पाहिजे, असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने निवेदनही दिले होते. पण त्यावर काहीही कार्यवाही न झाल्याने आजचा प्रसंग उद्भवला आहे, असेही भाजप कार्यकर्ते म्हणाले. एकूणच ऐन गणेशोत्सवात नागपुरात भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. हा वणवा आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.