Uday samant : उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीचा लेखाजोखा जाहीर होणार !

maharashtra-industry-investment-figures-saffron-paper-to-be-released-uday-samant-assembly : करार आणि अंमलबजावणीची ‘भगवी पत्रिका’ प्रसिद्ध करणार – उद्योगमंत्री उदय सामंत

 

Mumbai: राज्यात उद्योग क्षेत्रात झालेल्या गुंतवणुकीचे वास्तव चित्र स्पष्ट करण्यासाठी सरकार लवकरच ‘भगवी पत्रिका’ प्रसिद्ध करणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. राज्यात गेल्या काही वर्षांत उद्योग क्षेत्रात किती रकमांचे गुंतवणूक करार झाले आणि त्यापैकी किती करारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली याचा सविस्तर लेखाजोखा या पत्रिकेत मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभेत नियम २९३ अंतर्गत मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्ष सदस्यांनी राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीबाबत सरकार करत असलेले दावे चुकीचे असल्याची टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी राज्यात उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याचे स्पष्ट करत सरकारची भूमिका मांडली.

Mahayuti Government : कष्टकऱ्यांचे संरक्षण आणि सुरक्षित डिजिटल महाराष्ट्र; सरकार घेणार महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय

यावर्षी दावोस येथे झालेल्या बैठकीदरम्यान विविध उद्योग समूहांसोबत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या करारांपैकी सुमारे १५ लाख कोटी रुपयांचे करार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या क्षेत्रांसाठी झाले आहेत. त्याचप्रमाणे १५ लाख कोटी रुपयांचे करार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतील प्रकल्पांसाठी झाले असून सुमारे एक लाख कोटी रुपयांचे करार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत झाल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रात झालेले गुंतवणूक करार मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात उतरल्याचा दावा करताना मंत्री सामंत यांनी सांगितले की राज्यात झालेल्या करारांपैकी सुमारे ७५ ते ८० टक्के करार प्रत्यक्षात अंमलात आले आहेत. अनेक ठिकाणी उद्योग सुरू झाले आहेत किंवा उद्योग उभारणीची प्रक्रिया सुरू आहे. इतर राज्यांमध्ये होणाऱ्या गुंतवणूक करारांपैकी केवळ ३५ ते ४० टक्के करारांची अंमलबजावणी होते, असेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

Samruddhi mahamarg : मागण्या मान्य करा, नाहीतर सामूहिक आत्महत्येची परवानगी द्या!

राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीबाबत यापूर्वीही सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून वस्तुस्थिती मांडली होती. आता उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीचे अधिक स्पष्ट आणि तपशीलवार चित्र मांडण्यासाठी भगवी पत्रिका काढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग राज्यातून इतरत्र पळवले जात असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांनी राज्यात येत असलेल्या मोठ्या गुंतवणुकीकडेही लक्ष द्यावे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

Khamgao Municipal council : करवाढीच्या वादात ‘माशी शिंकली’? इशारे भरपूर, पण कारवाईचा पत्ता नाही!

दरम्यान, राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचेही मंत्री उदय सामंत यांनी मान्य केले. या अतिक्रमणांवर उपाययोजना करण्यासाठी सरकारकडून स्वतंत्र योजना आणण्यात येणार असून येत्या दोन महिन्यांत यासंदर्भातील धोरण जाहीर केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. औद्योगिक विकास महामंडळाच्या जमिनी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कार्यवाही करताना त्या ठिकाणी राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना पुनर्वसनासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या योजनेचा पर्याय देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

__