Sarpanch Manoj Lahudkar disqualified : शासन निर्देशांचे उल्लंघन आणि पदाचा गैरवापर भोवला
Chikhli शासनाच्या स्पष्ट निर्देशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, पदाचा गैरवापर करीत ग्रामपंचायतीचा निधी मनमानीपणे वापरणे आणि शासकीय कामकाजात अडथळे निर्माण करणे या गंभीर आरोपांवरून उदयनगर ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज लाहुडकर यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाअंतर्गत अपात्र ठरवण्यात आले आहे. ही कारवाई अमरावती विभागाचे अप्पर आयुक्त सूरज वाघमारे यांनी केली.
लाहुडकर यांनी शासनाकडून मंजूर विकासकामांशी संबंधित आवश्यक प्रक्रिया पाळली नाही, तसेच ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात अवाजवी हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांच्या कार्यात अडथळा निर्माण केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर २०२४ रोजी ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ३९(१) अंतर्गत लाहुडकर यांच्या चौकशीसाठी परवानगी मागितली. २३ जानेवारी २०२५ रोजी परवानगी मिळाल्यानंतर चौकशी सुरू झाली आणि २५ जुलै २०२५ रोजी अहवाल सादर करण्यात आला.
Zilla Parishad School : पालकांचा उद्रेक, शाळेला ठोकले कुलूप!
या अहवालात शासन निर्देशांचे वारंवार उल्लंघन,कर्तव्यात बेपर्वाई, निधीचा विस्कळीत वापर, राजकीय हेतुपुरस्सर वर्तन सर्व गोष्टी निष्पन्न झाल्याने सरपंच लाहुडकर यांना अपात्र घोषित करण्यात आले. उदयनगर ग्रामपंचायतीत आयोजित भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमांच्या निमंत्रणपत्रिकांमध्ये स्थानिक आमदार श्वेता महाले यांचा नामोल्लेख मुद्दाम टाळल्याची गंभीर नोंद चौकशीत झाली.
१९ आणि २५ जानेवारी २०२४ रोजी संबंधित निर्देश लेखी स्वरूपात देऊनही सरपंच व सचिवांनी ते पाळले नाहीत, असे गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद आहे. शासकीय कामांना हेतुपुरस्सर विलंब,निर्णय प्रक्रियेवर राजकीय प्रभाव,अधिकाऱ्यांना दबावाखाली काम करण्यास भाग पाडणे,या सर्व बाबींचा सर्वंकष अभ्यास करूनच प्रशासनाने ही कठोर कारवाई केली.








