Breaking

Uddhav Balasaheb Thackeray : सोयाबीनचा शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत केंद्र सुरू ठेवा

Continue to the soybean buying center until the last farmer arrives : शिवसेना आमदार सिद्धार्थ खरात यांचा आंदोलनाचा इशारा

Buldhana राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शासनाला ठोस मागणी केली आहे. नाफेडच्या शासकीय खरेदी केंद्राची मुदत संपली असली, तरी शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात सोयाबीन शिल्लक आहे. तो शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत केंद्र सुरू ठेवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात व शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिला आहे.

या मागणीसाठी आमदार सिद्धार्थ खरात व जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी मंत्रालयात पणन विभागाच्या प्रधान सचिवांची भेट घेतली व निवेदन सादर केले. त्यांनी चर्चा करताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले.

बारदान्याच्या तुटवड्यामुळे खरेदी केंद्र बंद पडली होती. त्यामुळे झालेल्या विलंबाचा फटका शेतकऱ्यांना बसला. १३ लाख टन खरेदीचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत केवळ ७ लाख टनच खरेदी पूर्ण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरात अद्याप मोठ्या प्रमाणात सोयाबीन साठवलेले आहे. मार्केटमध्ये कमी दर असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे, या मुद्यांचा यात समावेश आहे.

शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीसाठी शासनाने शासकीय खरेदी केंद्रांना तातडीने मुदतवाढ द्यावी. बारदान्याची व्यवस्था करावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. जर सरकारने दखल घेतली नाही, तर शिवसेना तीव्र आंदोलन उभारेल, असा गंभीर इशाराही आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिला आहे.