Dissatisfaction over district chief post in Shiv Sena, two resign : जिल्हाप्रमुखपदाच्या निवडीवरून वाद; भोजने, दळवींचे राजीनामे
Buldhana शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात जिल्हाप्रमुखपदाच्या नियुक्तीवरून प्रचंड नाराजी व्यक्त होत असून, पक्षातील ज्येष्ठ नेते वसंतराव भोजने आणि उपजिल्हाप्रमुख अविनाश दळवी यांनी आपापल्या पदांचा राजीनामा सादर केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या संघटनात्मक शिस्तीवर आणि स्थानिक नेतृत्व व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मागील आठवड्यात खासदार अरविंद सावंत यांच्या बुलढाणा दौऱ्यानंतर १५ जुलै रोजी नवीन पदनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. मात्र, मलकापूर, खामगाव आणि जळगाव जामोद विधानसभा क्षेत्राच्या जिल्हाप्रमुखपदी गजानन वाघ यांची नियुक्ती होताच, यावरून पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उसळला आहे.
Local Body Elections : बुलढाण्यात जिल्हा परिषदेच्या ६१ गटांसाठी निवडणुकीचा बिगुल!
१९८६ पासून शिवसेनेत सक्रिय असलेले वसंतराव भोजने यांनी जिल्हा सहसंपर्कप्रमुखपद नाकारत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे थेट राजीनामा पाठविला. “हे पद केवळ शोभेचे आहे; मी पदासाठी नव्हे तर विचारासाठी काम करणारा शिवसैनिक आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी इतर पक्षात जाणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, गजानन वाघ यांच्या निवडीवर त्यांची अंतर्गत नाराजी असल्याचेही पक्षातील वर्तुळात बोलले जात आहे.
१९९४ पासून उपजिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असलेले शेगावचे अविनाश दळवी यांनी, “ज्युनिअर लोकांना जिल्हाप्रमुखपद देण्यात येत असून, पक्षात काम करत असताना सल्लाही घेतला जात नाही,” अशी खंत व्यक्त करत आपला राजीनामा जिल्हा संपर्कप्रमुखांकडे पाठविला आहे.
या दोन्ही राजीनाम्यांमुळे ठाकरे गटात जिल्हा पातळीवर नेतृत्व निवडीबाबत असंतोष निर्माण झाला आहे. अनुभवी कार्यकर्त्यांना डावलून नवख्या कार्यकर्त्यांची वर्णी लावल्याचा आरोप आता उघडपणे समोर येत असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी पक्षासाठी अडचणीची ठरू शकते.
Krushna Khopde : कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करा!
भोजने आणि दळवी दोघांनीही सध्या तरी इतर कोणत्याही पक्षात जाण्याचा इन्कार केला असला, तरी संघटनात्मक विसंवाद आणि नियुक्तीतील गोंधळामुळे स्थानिक स्तरावर ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजीचे सूर चढू लागले आहेत.