Shivsena protest against ST fare hike : एसटी भाडेवाढीविरोधात शिवसेनेचा एल्गार
Washim राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या भाड्यात तब्बल १४.९५ टक्के वाढ केल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांवर मोठा आर्थिक भार पडला आहे. या निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या नेतृत्वाखाली वाशिम बसस्थानकात तीव्र निदर्शने केली. घोषणाबाजीमुळे संपूर्ण बसस्थानक परिसर दणाणून गेला होता.
शिवसैनिक आणि प्रवासी आक्रमक होत “रद्द करा, रद्द करा – भाडेवाढ रद्द करा!”, “प्रवाशांचा खिसा कापणाऱ्या सरकारचा धिक्कार असो!” अशा जोरदार घोषणांनी परिसर भारावून गेला. यावेळी प्रवाशांनीही आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणताही ठराव मंजूर न करता आणि कोणतीही पूर्वसूचना न देता ही भाडेवाढ लागू करण्यात आली. या निर्णयाविरोधात राज्यभरात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, वाशिम तालुकाप्रमुख रामदास मते, बालाजी वानखेडे, कॅप्टन प्रशांत सुर्वे, नामदेवराव हजारे, ज्योतीताई खोडे, नंदकिशोर भोयर यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“निवडणुकीआधी मोठमोठी आश्वासने देणाऱ्या महायुती सरकारने आता जनतेला लूटण्यास सुरुवात केली आहे,” असा आरोप जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी केला. “लाडक्या बहिणीच्या नावाने पैसे देणारे सरकार दुसऱ्या खिशातून तेच पैसे काढत आहे. सहा किलोमीटर अंतरासाठी एक रुपया भाडेवाढ हीही सामान्य प्रवाशांसाठी मोठी मार आहे,” असेही त्यांनी नमूद केले. ही भाडेवाढ रद्द होत नाही तोपर्यंत शिवसेना वेगवेगळ्या प्रकारे तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.